बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नेत्यांच्या बैठकीदरम्यान महिला भाजपा आमदारावर केलेल्या एका टिप्पणीमुळे सध्या ते वादात सापडले आहे. या टिप्पणीमुळे अस्वस्थ झालेल्या या महिला आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. २९ नोव्हेंबरला झालेल्या या बैठकीत हा प्रकार घडला.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाची बैठक झाली. यामध्ये भाजपा, जेडीयूसह अन्य काही पक्षांचे आमदार सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या दरम्यान बिहारमधल्या एकमेव आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या भाजपा आमदार निक्की हेम्ब्रम यांनीही आपला मुद्दा मांडला. आदिवासींना आपल्या उदरनिर्वाहासाठी ‘महुआ’ गोळा करणं आणि त्याची साठवणूक करण्याला परवानगी देण्याची मागणी केली.

त्यांच्या या मागणीनंतर नितीश कुमार म्हणाले, तुम्ही खूप सुंदर दिसता पण तुमचे विचार मात्र पूर्णतः वेगळे आहेत. तुम्हाला माहित आहे का की आम्ही अनुसूचित जाती-जमातींसाठी काय काय केलं आहे? तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रात जात नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार असं म्हणताच बैठकीला उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले, मात्र निक्की हेम्ब्रम यांना मात्र अवघडल्यासारखं झालं.

हेही वाचा – “हे आमच्यावर सक्तीने…”, वंदे मातरम गाण्यानं अधिवेशनाची सांगता करण्यावर एमआयएमच्या सदस्यांचा तीव्र आक्षेप!

द टेलिग्राफशी बोलताना हेम्ब्रम यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्या काही काळ स्तब्ध झाल्या आणि त्यांना सावरायला थोडा वेळ लागला. त्या म्हणाल्या, मला खूप अवघडल्यासारखं झालं. बहुतेक त्यांना माझ्या चिंतेचा मुद्दा कळला नसावा, पण त्यांनी जे शब्द वापरले त्यामुळे त्यांनी एका मला अक्षरशः कोर्टात जाब विचारायला उभं केल्यासारखं वाटलं. आम्ही त्यांना राज्याचे प्रमुख आणि आमचे रक्षणकर्ते मानतो, पण त्यांचं हे वागणं योग्य नव्हतं. त्यांनी मला चेष्टेचा आणि विनोदाचा विषय बनवलं. लोक माझ्यावर हसत होते. हे पुरुषांचं जग आहे. एका महिलेला आपला स्वाभिमान आणि आपल्या परिवाराची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे.

घडल्या प्रकाराची तक्रार निक्की हेम्ब्रम यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असून आता मी हे प्रकरण त्यांच्या ताब्यात दिल्याचं त्या म्हणाल्या. मी पक्षश्रेष्ठींकडून केल्या जाणाऱ्या कारवाईची वाट पाहीन आणि त्यांनी कारवाई केल्यानंतरच पुढची पावले उचलेन, असंही हेम्ब्रम यांनी सांगितलं.