Nitish Kumar Rajya Sabha Nomination latest update regarding Bihar new government: दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत मुख्यमंत्रीपदावर आरूढ असलेले नितीश कुमार आता राज्यसभेत जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या निर्णयामागचा विचार स्पष्ट केला आहे. तसेच नव्या सरकारला त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन राहिल, असाही शब्द दिला आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीला अवघे ४ महिने होताच नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र त्यांनीच या मागची भूमिका स्पष्ट केली आहे.
आज राज्यसभेचा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज शरद पवार, पार्थ पवार, विनोद तावडे, रामदास आठवलेंसह इतर उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा अर्ज भरताना केंद्रीय गृहमंत्री नितीश कुमारही उपस्थित राहणार आहेत.
जनता दल (संयुक्त) चे प्रमुख नितीश कुमार यांनी अर्ज भरण्याच्या तासाभरापूर्वी एक्सवर सविस्तर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली.
नितीश कुमार म्हणाले, “मागच्या दोन दशकांपासून बिहारच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला समर्थन दिले. याच बळावर आम्ही बिहारची सेवा केली. जनतेच्या विश्वास आणि समर्थनामुळेच बिहार आज विकासाच्या वाटेवर आहे. यासाठी मी अनेकदा जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.”
नव्या सरकारबाबत केले भाष्य
“संसदीय कारकिर्दीची सुरूवात केल्यानंतर माझ्या मनात इच्छा होती की, बिहारच्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहाचा सदस्य व्हावे. तसेच संसदेच्याही दोन्ही सभागृहात काम करावे. त्याप्रमाणे यंदा होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मी अर्ज सादर करत आहे. बिहारच्या जनतेशी असलेले माझे संबंध भविष्यातही कायम राहतील. जे नवीन सरकार स्थापन होईल, त्याला माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल”, असेही नितीश कुमार यावेळी म्हणाले.
बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण?
चार महिन्यांपूर्वी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय प्राप्त झाला होता. भाजपा आणि जदयूच्या आघाडीने २४३ पैकी २०० हून अधिक जागा जिंकून भक्कम बहुमत प्राप्त केले होते. त्यातही भाजपा मोठा पक्ष ठरूनही मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांन दिले गेले होते. आता अवघ्या चार महिन्यात नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होत असल्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाकडून मुख्यमंत्री दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात सम्राट चौधरी आणि नित्यानंद राय हे दोन प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. असे झाले तर बिहारला पहिला भाजपाचा मुख्यमंत्री मिळणार आहे.
