“बिहारमध्ये ‘क्राईम’ (गुन्हा) होऊ शकतो, मात्र राज्यात ‘अपराध’ नाही आणि कोणी अपराधीही नाही,” असा अजब दावा बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका सुरू केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी या विधानाचा खरपूस समाचार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मंगळवारी दिल्लीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री चौधरी यांनी हे वक्तव्य केले. इंग्रजीतील ‘क्राईम’ आणि हिंदीतील ‘अपराध’ या एकाच अर्थाच्या शब्दांमधील चौधरींचा हा फरक ऐकून सभागृहातील उपस्थितही अचंबित झाले.
चौधरी नेमके काय म्हणाले?
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्याकडे कोणताही अपराध नाही. बिहारमधून अपराधाची संकल्पनाच नष्ट झाली आहे. ‘क्राईम’ होऊ शकतो, पण ‘अपराध’ नाही आणि इथे कोणताही अपराधी शिल्लक राहिलेला नाही.”
तेजस्वी यादवांचा टोला
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी जोरदार निशाणा साधला. “बिहारमध्ये ‘क्राईम’ असू शकतो, पण ‘अपराध’ नाही!” असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी चौधरी यांच्या जुन्या प्रकरणांचा हवाला दिला.
“सात जणांच्या हत्या प्रकरणातील आरोपींबरोबर काम करताना मंचावरील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना अभिमान वाटत असेल की लाज?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माणसाला बिहार उद्ध्वस्त करण्याची ‘सुपारी’ दिली आहे का?” अशी खोचक विचारणाही यादव यांनी केली.
उल्लेखनीय बाब म्हणजे, ९० च्या दशकात मुंगेर जिल्ह्यातील सात जणांच्या हत्या प्रकरणात चौधरी यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले होते. मात्र आपल्याला राजकीय वैमनस्यातून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आले होते, असा दावा चौधरी यांनी सातत्याने केला आहे. चौधरी हे बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद भूषवणारे भाजपाचे पहिलेच नेते असून त्यांच्याकडेच गृहखात्याची जबाबदारी आहे.
चिराग पासवान यांची सावध भूमिका
दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया विचारली असता केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी थेट वादात पडणे टाळले. मात्र त्यांनी चौधरी यांच्या भूमिकेचे अप्रत्यक्ष समर्थन केले. “सम्राट चौधरी हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही आहेत; त्यामुळे त्यांच्याकडे या दाव्याचे समर्थन करणारी आकडेवारी आणि वस्तुस्थिती नक्कीच असेल. एक बिहारी म्हणून माझे राज्य गुन्हेगारीमुक्त व्हावे आणि गुंतवणूकदारांसाठी ते एक सुरक्षित केंद्र बनावे, अशी माझीही इच्छा आहे,” असे पासवान म्हणाले.
