पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर पहिल्यांदाच इंग्लंडला निघालेल्या नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर आता बिहार निवडणुकीतील भाजपच्या लाजीरवाण्या पराभवाचे सावट आहे. बिहार निवडणुकीतील पराभवामुळे अडचणीत सापडलेले मोदी या आठवड्यात लंडनमध्ये येत आहेत, असे इंग्लंडमधील विविध वृत्तपत्रांनी म्हटले आहे. त्याचबरोबर काही मोदी विरोधकांनी इंग्लंडमध्ये थेट ‘मोदी नॉट वेलकम’ असे पोस्टरही लावले आहेत.
येत्या गुरुवारपासून मोदींचा तीन दिवसीय दौरा सुरू होणार आहे. यामध्ये ते इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी पुढे नेण्याच्या दृष्टीने मोदींच्या इंग्लंड दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून अमेरिका, जपान, आस्ट्रेलियासह विविध देशांमध्ये मोदींचे मोठे दिमाखात स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा नेता म्हणून आंतरराष्ट्रीय माध्यमे मोदींकडे पाहू लागली. पण दिल्ली आणि पाठोपाठ बिहारमध्ये भाजपला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मोदींची देशातील लोकप्रियता कमी झाली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दिल्ली आणि बिहारमध्ये मोदी यांनी प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या. दोन्ही ठिकाणी मोदींच्याच प्रतिमेचा भाजपने निवडणुकीसाठी वापर केला होता. तरीही पक्षाला अपेक्षित यश मिळाली नाही.
इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना मोदी वेम्ब्ले मैदानामध्ये सुमारे ६० हजार अनिवासी भारतीयांच्या समुहाशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये अशा कार्यक्रमांना खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता लंडनमध्ये मोदी यांचे किती मोठे स्वागत होते, याकडेही आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष लागले आहे.