नितीशकुमार यांच्या नव्या सरकारमधील उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देशातील तपास यंत्रणांना खुले आव्हान दिले आहे. तपास यंत्रणांनी माझ्या घरी येऊन छापा टाकावा, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी केंद्रतील भाजपा सरकावरही निशाणा साधला आहे.

तपास यंत्रणांना आव्हान

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी यादव यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ‘’देशातील तपास यंत्रणा या भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. मात्र आम्ही त्यांना घाबरत नाही. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आमंत्रण देतो आहे की त्यांनी माझ्या घरी यावं. हवा तेवढा वेळ थांबाबं, हवी ती चौकशी करावी’’, असे ते म्हणाले.

विश्लेषण: नितीशकुमार यांच्या खेळीने भाजपचे गणित बिघडले?

‘’हा अचानक झालेला निर्णय’’

‘’पाच वर्षापूर्वी आमचे गठबंधन तुटले. त्यावेळी नितीशकुमार अस्वस्थ होते. भाजपा त्यांच्यावर दबाव आणत होती. मात्र, आता झालेली युती ही पूर्वनियोजित नव्हती. हा अचानक झालेला निर्णय होता. दोन्ही पक्षांच्या आमदारांनी बसून राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत हा निर्णय घेतला’’, असेही ते म्हणाले.

विश्लेषण : नितीशकुमार नरेंद्र मोदींविरोधात २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का?

नितीश कुमार पंतप्रधानपदाचे दावेदार?

२०२४ मध्ये नितीशकुमार पंतप्रधान पदाचे दावेदार असतील का? यावरही तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली. ‘’नितीशकुमार यांना प्रशासनाचा आणि सामाजिक कार्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते केंद्रात मंत्रीही राहीले आहेत. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकतात, तर मग नितीशकुमार का नाही? मुळात या देशात पंतप्रधान कोणीही बनू शकतो’’, असे ते म्हणाले. तसेच यांनी २०२४ मध्ये विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहनही केले. ‘’विरोधकांनी २०२४ साठी एकत्र काम करायला पाहिजे. त्यासाठी एक रोडमॅप तयार करायला हवा. आपण आधीच खूप उशीर केला आहे’’, असे ते म्हणाले.