Bihar Election 2025 Exit Polls Axis My India predicts 121-141 seats for NDA : बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) युती बिहारमध्ये पुन्हा सत्तेत येण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
२०२५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या अॅक्सिस माय इंडिया (Axis My India) एक्झिट पोलनुसार, एनडीएला विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या तुलनेत काहीशा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे.
बिहारमध्ये वादग्रस्त ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स’ च्या छायेखाली झालेल्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एनडीएला १२१ ते १४१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाआघाडीला ९८ ते ११८ जागा मिळू शकतात.
तर या निवडणुकीच्या प्रचारावेळी चर्चेचा विषय ठरलेला प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्षाला त्यांच्या पहिल्या निवडणुकीत खातेही उघडता येणार नाही किंवा जास्तीत जास्त पक्षाला एक जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बिहारमध्ये कोणाला किती मते मिळणार?
बिहारची निवडणूक अगदी अटीतटीची होणार असल्याचा अंदाज अॅक्सिस माय इंडियाने वर्तवलेल्या मतांच्या टक्केवारीमधून व्यक्त करण्यात आला आहे
२०२० मध्ये ज्या एनडीएला ३७ टक्के मते मिळाली होती, त्यांना यावेळी ४३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. महाआघाडी देखील एनडीएच्या फार मागे नाही. या एक्झिट पोलमध्ये महाआघाडीला ४१ टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत झालेल्या ६ टक्क्यांची वाढीचे मुख्य कारण चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष आणि उपेंद्र कुशवाहा यांचे एकत्र येऊन निवडणूक लढणे सांगितले जात आहे. २०२० मध्ये हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते.
जरी अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार, प्रशांत किशोर यांच्या पक्षाला विजयाच्या बाबतीत मोठा प्रभाल पाडता आला नसला तरी हा पक्ष काही प्रमाणात मते स्वतःकडे खेचून घेईल, ज्यामुळे याचा फटका महाआघाडीच्या कामगिरीला बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार जन सुराज पक्षाला ४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
मंगळवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या बहुतेक एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी एनडीएला स्पष्ट विजय मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. ज्यामध्ये महाआघाडी १०० जागाही पार करू शकणार नाही असे म्हटले आहे. असे झाले तर नितीश कुमार यांच्यासाठी हा खूप मोठा विजय असणार आहे.
२०२० मध्ये, जेडीयूला मोठा फटका बसला होता. २०१५ च्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या ७१ जागांवरून त्यांनी जिंकलेल्या जागांची संख्या ४३ वर आली होती. याउलट, भाजपाने ७४ जागा मिळवल्या होत्या. तर, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीने ७५ जागा मिळवल्या होत्या आणि तो पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता.
एनडीएला फायदेशीर ठरलेले घटक कोणते?
एक्सिस माय इंडियानुसार, एनडीएला ओबीसी, ईबीसी, एससी, आणि उच्चवर्णीय मतदारांचा पाठिंबा मिळेल. तर महाआघाडीला ओबीसी मते आपल्याकडे वळवण्यात अपयश आले असून त्यांना पारंपरिक मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळेल असा अंदात वर्तवण्यात आला आहे.
असे असले तरी मतदान हे तेजस्वी यादव यांच्या विरोधात झालेले नाही. कारण, अॅक्सिस माय इंडियानुसार, तेजस्वी यादव हे मतदारांची मुख्यमंत्रीपदासाठीची पहिली पसंती आहेत. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ३४ टक्के मतदारांना तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, तर नितीश कुमार यांना २२ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.
महिलांची एनडीएला पसंती
अॅक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार, जवळपास ४५ टक्के महिलांनी एनडीएला मत दिले आहे. तर ४० टक्के महिलांनी महाआघाडीला मते दिली आहेत. किशोर यांच्या जन सुराज पक्षाला महिलांची ३ टक्के मते मिळाली आहेत.
या निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग पुरुषांपेक्षा १० टक्क्यांनी जास्त होता. महिलांचा ७४.०३ टक्के मतदान केले तर तर पुरुषांची आकडेवारी ६४.१ टक्के होती.
हा वाढलेला टक्का एनडीएसाठी (NDA) फायदेशीर ठरल्याचे मानले जात आहे. कारण एनडीएने मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला १०००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेमुळे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात एनडीएच्या बाजूने झुकला असण्याची शक्यता आहे.
