Bihar Election 2025 Results Asaduddin Owaisi First Reaction : बिहार विधानसभा निवडणूक व सात राज्यांमधील आठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल आज (१४ नोव्हेंबर) जाहीर झाले आहेत. या निकालांवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या पक्षाने बिहारमध्ये पाच जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एमआयएमचे कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानले.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “बिहारमध्ये आमच्या पक्षाचे पाच आमदार निवडून आले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो.” ओवैसी यांनी यावेळी त्यांच्या उमेदवारांना निवडून देणाऱ्या व बिहारमध्ये एमआयएमला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, “मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. तुमच्या कष्टांमुळेच आपण बिहारमध्ये पाच जागा जिंकू शकलो. मला विश्वास आहे की आपले निवडून आलेले आमदार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील.”

मी आधीपासून सांगतोय राजद भाजपाला रोखू शकत नाही : ओवैसी

तेलंगणामधील जुबली हिल्स पोटनिवडणुकीचा उल्लेख करत ओवैसी यांनी काँग्रेसचे विजयी उमेदवार नवीन यादव यांना शुभेच्छा दिल्या. बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, “मी आधीपासून सांगतोय की बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल भारतीय जनता पार्टीला रोखू शकत नाही.”

बिहारमध्ये एमआयएमचे पाच उमेदवार विजयी

ओवैसी यांनी बिहारमधील मुस्लीमबहूल सीमांचल भागावर लक्ष केंद्रीत केलं होतं. बिहारमधील २९ जागांवर एमआयएमने उमेदवार उतरवले होते. त्यापैकी २४ जागा सीमांचल भागात येतात. येथील पाच जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. एमआयएमने या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए किंवा विरोधकांच्या महाआघाडीबरोबर युती न करता ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. तरीदेखील त्यांच्या पक्षाने पाच जागांवर विजय मिळवला आहे.