Prashant Kishor On Bihar Election: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळालं, तर विरोधकांना मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं. तसेच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षालाही बिहारच्या निवडणुकीत धक्का बसला. जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. एवढंच काय तर अनेक मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी बिहारच्या जनतेचा कौल मान्य केला. मात्र, बिहारमधील पराभवाचा त्यांच्यावर नेमकं काय इम्पॅक्ट झाला? याबाबत सांगताना प्रशांत किशोर यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ‘बिहारमध्ये झालेला पराभव हा माझ्यासाठी मोठा धक्का आणि दुःख आहे’, असं प्रशांत किशोर यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
प्रशांत किशोर काय म्हणाले?
बिहार निवडणुकीतील पराभवाचा तुमच्यावर वैयक्तिक काय इम्पॅक्ट (परिणाम) झाला असं तुम्हाला वाटतं? असा प्रश्न विचारला असता उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, “खरं तर खूप मोठा इम्पॅक्ट झाला. आपण जेव्हा एखादी गोष्ट खूप प्रामाणिकपणे करतो आणि आपल्याला अपयश येतं. आता उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास समजा आपण एखादी परीक्षा देण्यासाठी तीन वर्ष अभ्यास केला पण तरीही आपण नापास झालो तर आपल्याला मोठा झटका बसणारच. आम्ही देखील एक माणूस आहोत, त्यामुळे असं नाही की निवडणुकीच्या पराभवाचा माझ्यावर काहीही इम्पॅक्ट झाला नाही, नक्कीच माझ्यावर देखील इम्पॅक्ट झाला आहे”, अशं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
“समजा एखाद्या विद्यार्थाने अभ्यास केला नाही आणि मग परीक्षेत नापास झाला तर त्या विद्यार्थाला दु:ख वाटण्याचं काहीही कारण नाही. असंच मागच्या १० ते १२ वर्षांपूर्वी मला उत्तर प्रदेशात एक मोठा धक्का बसला होता. त्यानंतर मला असं वाटलं की उत्तर प्रदेशात खूप गोष्टी करण्यासारख्या होत्या, त्या मी केल्या नाही, त्यामुळे तेथे अपयश आलं. त्या अनुषंगाने विचार केला तर बिहारमधील पराभव हा माझ्यासाठी धक्का आहे, माझ्यासाठी मोठं दु:ख आहे. कारण बिहारमध्ये मी माझं सर्वस्व पणाला लावलं होतं, पण तरीही यश मिळालं नाही. आता पराभवाचं दु:ख झालं म्हणून रडायचं की पुढे चालायचं हे आता माझ्यावर आहे. पण मला वाटतं की जो विचार घेऊन आम्ही बिहारमध्ये आलो, तो विचार घेऊन पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलं पाहिजे”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
प्रशांत किशोर यांची पराभवानंतर पहिली मोठी घोषणा
प्रशांत किशोर हे पुढील पाच वर्षांत त्यांच्या उत्पन्नातील ९० टक्के रक्कम त्यांच्या पक्षाला म्हणजे जनसुराज पक्षाला देणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, “गेल्या २० वर्षात मी जी काही संपत्ती मिळवली, ती सर्व संपत्ती फक्त दिल्लीतील माझं घर वगळता, मी ती पक्षासाठी दान करणार आहे.” बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर काही दिवसांतच प्रशांत किशोर यांनी ही घोषणा केली.
