भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं असून बिहार विधानसभेत आता एनडीए आघाडीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बिहारच्या निकालानंतर देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून नेतेमंडळीही विजयावर प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनीही बिहार विजयावर आनंद व्यक्त केला. त्यानंतर,आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी विषारी प्रचार चालवला होता-देवेंद्र फडणवीस
दुसरी एक बाब अशी आहे की काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवला आहे त्याला जनतेने उत्तर दिलं आहे. संवैधानिक संस्थांचा अपमान करणं. जनमताला विरोध दर्शवणं, जनतेला हे कळलं आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो त्या मतांचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एकीकडे राजदची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेसची अवस्था आणखी वाईट आहे. काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी निकाल तिकडे आला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींनी नदीत उड्या मारुन पाहिल्या, डान्स करुन पाहिला पण..
राहुल गांधींनी व्होट चोरीची यात्रा काढून पाहिली, नदीत उड्या मारुन पाहिल्या, डान्स करुन पाहिला पण लोकांचा विश्वास मोदींवर आणि नितीश कुमार यांच्यावरच आहे. जोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे पक्ष आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येणार नाहीत. जातीचा मुद्दा आणि इतर सगळे मुद्दे मागे पडले आहेत. बिहारच्या जनतेसाठी विकास आणि सुशासन हाच मुद्दा प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी, नितीशजी हाच मुद्दा ठरला आहे. मी ज्या ठिकाणी प्रचार केला तिथेही लक्षात येत होतं की एनडीए खूप चांगल्या परिस्थितीत आहे. काही प्रमाणात अँटी इन्कंबन्सी मागच्या निवडणुकीच्या वेळी दिसली ती यावेळी अजिबातच दिसली नाही. प्रो इन्कंबन्सीचाच हा विजय आहे. १६० जागांच्या पुढे जाऊ असं आम्हाला वाटलं होतं. पण बिहारच्या जनतेने आम्हाला त्याही पेक्षा जास्त मतदान केलं आहे.
काँग्रेस आणि राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांचं पतन होत राहिल-देवेंद्र फडणवीस
जोपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांचं पतनच होत राहिल. हे लोक कोर्टात गेले तिथे हरले. त्यानंतर निवडणूक आयोगाने कांग्रेसला चॅलेंज दिलं तुम्ही येऊन पुरावे घेऊन या. पण ते गेलेही नाहीत. कारण त्यांनाही माहीत आहे की आपण खोटं बोलत आहोत. लोकसभेच्या वेळीही त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला होता. तो फार काळ चालला नाही. लोकांना समजलं की तो फेक नरेटिव्ह होता. बिहारपेक्षा वाईट स्थिती त्यांची भविष्यात होत राहिल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक झाली आहे. आता मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबाबत आमचे वरिष्ठ नेते आणि मोदी निर्णय घेतील. बिहारमध्ये महिलांनी कायमच एनडीएला मतं दिली आहेत. फक्त महिलाच नाही युवांनीही मतदान भरभरुन दिलं आहे. मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
