Bihar Election result 2025 : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या या विजयाच्या मागे भाजपाची आक्रमक रणनीती आणि मोदी-नितीश जोडीचा प्रभाव दिसून आला. या विजयाचे मोठे श्रेय भाजपाचे रणनीतीकार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिले जात आहे. संघटन मजबूत करण्यात आणि उमेदवारांची निवड करण्यात त्यांनी जमिनी स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतीय जनता पक्षाने चाणाक्ष रणनीती आणि बूथ स्तरावरील आक्रमक व्यवस्थापन याच्या जोरावर आणखी एका राज्यात विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. २०२० मध्ये भाजपाने राज्यात ७४ जागा जिंकल्या होत्या, यंदा भाजपा ९३ जागांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. भाजपाची बिहारमधील ही आत्तापर्यंतची सर्वोच्चम कामगिरी ठरली आहे. एनडीएने बिहारमध्ये बहुमताचा आकडा सहज पार केला असून त्यांना २०० जागांचा आकडा पार केला आहे.

तर दुसरीकडे महागठबंधनची कामगिरी मात्र सुमार राहिली आहे. काँग्रेसला ५ हून कमी जागा आणि आरजेडीला २७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. पण एनडीएचा हा दमदार विजय फक्त नितीश कुमार यांच्या कल्याणकारी योजनांचा परिणाम नाही, तर तो भाजपाच्या आक्रमक, अत्यंत अचूक रणनीतीचा परिणाम देखील आहे.

भाजपाच्या विजयाची कारणे काय?

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने गेल्या काही वर्षांतील आजवरची सर्वात आक्रमक प्रचार मोहीम चालवली. यामध्ये त्यांनी महगठबंधनला प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था या मुद्द्यांवर लक्ष्य केले. तसेच त्यांनी मतदारांना ‘जंगल राज’ची आठवण करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू यादव यांच्या काळातील जंगल राजच्या मुद्द्यावर केलेली टीका या निवडणुकीत निर्णायक ठरली. मोदींच्या या टीकेमुळे आरजेडीच्या काळातीस बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. जात आणि धर्माच्या पलीकडे जात हा संदेश मतदारांपर्यंत पोहचला. तरुण मतदार आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या महिला मतदारांनी या मुद्द्यावर एनडीएच्या पारड्यात मत दिलं.

या काळात मोदी आणि नितीश यांची भागिदारी ही स्थिरता देणारी आणि विश्वास वाढवणारी ठरली. मोदींचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व आणि नितीश कुमार यांनी जमिनी स्तरावरील केलेली कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी याचा दुहेरी फायदा झाला. याबरोबरच एनडीएच्या रणनीतीकारांनी महिलांना १० हजार रुपये थेट खात्यात जमा केल्याने महिलांची मते वळवण्यात एनडीएला चांगलेच यश मिळाले. भाजपाला मिळालेला हा विजय हा नक्कीच अपघाताने मिळालेला नाही, तर तो पूर्णपणे सुनियोजित होता.

धर्मेंद्र प्रधान यांनी विजयाची रणनिती कशी आखली?

धर्मेंद्र प्रधान यांचे बिहारशी जुने संबंध असून देखील भाजपाचे निवडणूक प्रभारी म्हणून त्यांची नेमणूक ही सप्टेंबरमध्ये करण्यात आली. २०१२मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले, तेव्हापासून ते राज्यात संघटनेची पकड मजबूत करण्यावर काम करत आले आहेत. या काळात त्यांचे नितीश कुमार यांच्याशी चांगले नाते तयार झाले.

धर्मेंद्र प्रधान यांनी ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत एनडीएच्या बिहार प्रचाराच्या रणनीतीची उभारणी कशी होती याबद्दल माहिती दिली. यामध्ये तीन मुख्य आधारस्तंभ होते असेही प्रधान यांनी सांगितले.

१) प्रधान यांनी नमूद केले की एनडीएची बिहारमधील ताकद ही अचानक निर्माण झालेली नसून, १९९० च्या दशकापासून विचारपूर्वक तयार केलेल्या सामाजिक-राजकीय युतीचा तो परिणाम आहे. या दीर्घकालीन रणनीतीमुळे ओबीसी, ईबीसी आणि महिला यांसारख्या घटकांमध्ये स्थिर व्होट बँका तयार झाल्या, ज्यामुळे एनडीएला नवीन युतींच्या विरोधात एक रचनात्मक फायदा मिळतो.

२) आरजेडी आणि काँग्रेस यांच्या काळात कायद्याचा धाक नसणे आणि गैरकारभार याचा वारंवार उल्लेख करून, एनडीएने एक विरोधाभास तयार केला आणि तोच ती वर्ष पाहिलेल्या मतदारांना भावनांशी जुळून आला.

३) प्रधान यांनी जोर देऊन सांगितले की, बिहारमधील मतदार, विशेषत: तरुण आणि महिला, आता केवळ ओळख नाही, तर अपेक्षांनी प्रेरित आहेत. या मतदारांचा गटाला कामाची पूर्तता, रोजगार, चांगले प्रशासन आणि सातत्य हवे आहे. अशा वातावरणात, मोदी-नितीश भागीदारीने विश्वसनीयता आणि विकासाचे स्वप्न दाखवले.

धर्मेंद्र प्रधान यांचा ओबीसी फॅक्टर

नितीश कुमार यांची दिर्घकाळापासून वोट बँक असलेल्या ओबीसी समाजातून येत असल्याने धर्मेंद्र प्रधान हे विशेष प्रभावी ठरतात. यामुळे त्यांना बिहारच्या जातीय समिकरण आणि मतदारांची समज आहे. प्रधान यांनी केवळ दूर राहून प्रचारावर देखरेख केली नाही—तर त्यांनी जमिनी स्तरावरील माहितीच्या आधारावर उमेदवारांची यादी नव्याने तयार केली, स्थानिक आघाड्यांमध्ये बदल केले आणि मतदारसंघ-पातळीवर अचूक रणनीती तयार केली.