Bihar Election Results 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने जोरदार विजय मिळवत विरोधकांचे अशरक्षः पानिपत केले. एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. २०२० साली महाआघाडीने एनडीएला चांगली टक्कर दिली होती. आरजेडीने ७५ जागा जिंकल्या होत्या. तर यंदा आरजेडीला ३० हून कमी जागा जिंकता आल्या आहेत. तर काँग्रेसला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाहीत.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाने अनपेक्षित यश मिळवले आहे. त्यांनी १९ जागांवर विजय मिळवला आहे. तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला यश मिळू शकलेले नाही.
जनता दलाला २०२० पेक्षाही अधिक जागा
जनता दल (युनायटेड) पक्षाला २०२० मध्ये ४३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना फारसे यश मिळेल, याची शक्यता कमी होती. परंतु या निवडणुकीत त्यांनी ८३ जागांवर आघाडी घेतली आहे. २०२० साली नितीश कुमार यांना नुकसान पोहोचवणाऱ्या चिराग पासवान आणि कुशवाह यांना एनडीएमध्ये सामील करून घेतल्यामुळे मतांचे विभाजन झाले नाही. ज्याचा लाभ सर्वच पक्षांना झालेला दिसत आहे.
एचएएम(एस) आणि आरएलएम
जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) आणि कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी सहा जागा लढवत होते. या दोन पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे.
| पक्ष | जिंकले | आघाडीवर | एकूण |
| भारतीय जनता पक्ष – भाजप | ८२ | ७ | ८९ |
| जनता दल (संयुक्त) – जद(यू) | ७५ | १० | ८५ |
| राष्ट्रीय जनता दल – राजद | २२ | ३ | २५ |
| लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – LJPRV | १७ | २ | १९ |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – आयएनसी | ६ | ० | ६ |
| ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – AIMIM | ५ | ० | ५ |
| हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) – HAMS | ५ | ० | ५ |
| राष्ट्रीय लोक मोर्चा – RSHTLKM | ३ | १ | ४ |
| भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) (मुक्ती) – सीपीआय (एमएल) (एल) | २ | ० | २ |
| इंडियन इन्क्लूसिव्ह पार्टी – आयआयपी | ० | १ | १ |
| भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) | १ | ० | १ |
| बहुजन समाज पक्ष – बसपा | ० | १ | १ |
| एकूण | २१८ | २५ | २४३ |
