लोकसभा निवडणुकीनंतर चौखूर उधळलेला भाजपचा विजयाचा वारू आधी दिल्लीत आणि आता बिहारमध्ये अडवण्यात विरोधकांना यश आले आहे. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अवघ्या ५८ जागांवरच विजय मिळवता आला तर जदयू-राजद महाआघाडीने तब्बल १७८ जागांवर विजय मिळवत भाजपला अस्मान दाखवले. जातीय ध्रुवीकरण करण्याचा मोदी-शहा यांचा डाव बिहारी मतदारांनी अक्षरश उधळून लावत सलग तिसऱ्यांदा नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली.
बिहारमध्ये नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांना निवडून दिले तर पाकिस्तानात फटाके फोडून आनंद साजरा होईल, गाईंचे संरक्षण होणार नाही, मुस्लिमांना आरक्षण दिले जाईल.. अशा छापाची विखारी विधाने करत भाजप नेतृत्वाने बिहारमध्ये मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र, बिहारी मतदारांनी त्यास भीक न घालता पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याच नेतृत्वावर विश्वास दर्शवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ३१ प्रचारसभा घेऊनही भाजपच्या पदरात अपयशच पडल्याने भाजप समर्थकांमध्ये
चिंतेचे वातावरण होते. प्रचारकाळातील अनेक मुद्दय़ांमुळे ही निवडणूक अतिशय गाजली आणि प्रतिष्ठेचीही ठरली. नितीश यांनी आपला विश्वासघात केला असून लालूप्रसाद नितीशसोबत आल्यामुळे ‘जंगलराज-२’ सुरू होईल, असा आक्रमक प्रचार भाजपने केला होता. ‘आरक्षण धोरणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे’, या रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानामुळे मोठे वादळ उठले आणि त्यावरून महाआघाडीने भाजपवर टीकेची झोड उठवली होती. ‘हिंदू लोकही गायीचे मांस खातात’, असे वक्तव्य करून लालूप्रसाद यांनी हिंदुत्ववादी भाजपच्या हाती जणू कोलीत दिले होते. त्यामुळेच भाजपने मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात गाईच्या चित्रासह जाहिराती प्रकाशित करून या मुद्दय़ाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता.
मतमोजणीच्या सुरुवातीला निकालांचे कल रालोआच्या बाजूने झुकत असल्याचे काही वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात येत होते. त्यामुळे अंगात वीरश्री संचारलेल्या भाजप समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर रालोआ व महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले. कालांतराने रालोआ मागे पडली व महाआघाडीने सरशी साधली. त्यामुळे भाजप समर्थकांनी तातडीने जल्लोषासाठी केलेली जय्यत तयारी गुंडाळून ठेवली तर महाआघाडीच्या समर्थकांनी जल्लोष केला.

नितीश राष्ट्रीय पातळीवर?
बिहार विधानसभेच्या निकालांचे राष्ट्रीय राजकारणावरही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआने लोकसभा निवडणुकीत भरीव कामगिरी केली. त्यानंतर दिल्लीचा अपवाद वगळता महाराष्ट्र, हरयाणा, जम्मू-काश्मीर व झारखंड या राज्यांत भाजपने उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वकौशल्यावर शिक्कामोर्तब झाले होते. याच आधारावर बिहारमध्येही ‘मोदी कार्ड’ चालेल, अशा गृहितकातून पक्षाने राज्यातील कुणा नेत्याला पुढे न करता मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा या दोघांच्या खांद्यावरच प्रचाराची धुरा सोपवली होती. मात्र, बिहारच्या निकालांचा अर्थ ‘मोदींची जादू’ चालली नाही असाही काढला जाणार आहे. याउलट, नितीश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवरील नेता म्हणून ‘प्रोजेक्ट’ केले जाईल, असे संकेत मिळत आहेत.

पाटीदार समाजाचा जल्लोष
अहमदाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याबद्दल पाटीदार समाजाने रविवारी जल्लोष साजरा केला. अनेक ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला आणि गुजरातमध्ये २२ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्याचा निर्धार पाटीदार नेत्यांनी व्यक्त केला.

आरक्षण, दादरी हत्याकांड, गोमांसाचा मुद्दा, भाजपच्या वाचाळवीरांनी वेळोवेळी केलेली तिखट वक्तव्ये, त्यानंतर असहिष्णुतेविरोधात विचारवंतांनी सुरू केलेली पुरस्कारवापसी मोहीम.. या पाश्र्वभूमीवर बिहारच्या मतदारांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सपशेल धुडकावून लावले आणि पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केले. रविवारी जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालांत जदयू-राजद व काँग्रेस महाआघाडीने तब्बल १७८ जागांवर विजय मिळवत दोन तृतीयांश बहुमत प्राप्त केले. केंद्रात सत्ताधारी असलेला भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे ऐन दिवाळीत भाजपची अवस्था दीनवाणी झाली असून महाआघाडीने मात्र स्पष्ट जनादेशाच्या आधारावर धनत्रयोदशी साजरी केली!

बिहार निवडणुकीत मोदी-शहा जोडीला धक्का; भाजपची ‘दीन’ दिवाळी

महाआघाडी
काँग्रेस २७
संयुक्त जनता दल ७१
राष्ट्रीय जनता दल ८०

रालोआ
भाजप ५३
लोकजनशक्ती पार्टी २
रालोप+हम ३

इतर
भाकप ३
अपक्ष ४

मिळालेल्या जनादेशात देशाचा कल प्रतिबिंबित होत आहे. जनतेला राष्ट्रीय पातळीवर एक सशक्त पर्याय हवा आहे. प्रभावी विरोधी पक्षासाठी केंद्रात बिगरभाजप पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जनतेने धुडकावून लावला आहे.
– नितीशकुमार,
बिहारचे मुख्यमंत्री

बिहारमधील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पराभवाचा आम्ही स्वीकार करतो. नवे सरकार बिहारला विकासाच्या पथावर नेईल, यासाठी त्यांना शुभेच्छा.
– अमित शहा,
भाजपचे अध्यक्ष

बिहारी मतदारांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवल्याच्या पाश्र्वभूमीवर नितीशकुमार यांनी रविवारी पाटणा येथे मतदारांना अभिवादन केले.