bihar exit polls update predict setback to Grand Alliance : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडला, तर ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. यानंतर सर्वत्र बिहार निवडणुकीत कोणाला यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान संभाव्य निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत.
एक्झिट पोलमध्ये, विरोधी पक्षांच्या महाआघाडीची कामगिरी ही निराशाजनक दाखवण्यात आली आहे. या अंदाजांमध्ये त्यांना २०२० मध्ये मिळालेल्या ११० जागांपेक्षा खूपच कमी जागा मिळतील, असे दर्शवले आहे. यानुसार सर्वाधिक फटका हा लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला बसण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे हा पक्ष मागच्या वेळी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. यंदाच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान भाजपाला मिळेल, असे दिसून येत आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे हे एक्झिट पोल हे बहुतांश वेळा चुकीचे ठरले आहेत. विशेषतः बिहारच्या निवडणुकांबाबत हे अंदाज अनेकदा चुकल्याचे पाहायला मिळाले आहे.
यावेळी दैनिक भास्कर, मॅट्रीझ, पीपल्स इनसाइट, चाणक्य स्ट्रॅटेजीज आणि पीपल्स पल्स यांसह सर्व प्रमुख एक्झिट पोल्सनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, एनडीएला १३० ते १६७ च्या दरम्यान जागा मिळतील, तर महाआघाडीला ७३ ते १०८ च्या दरम्यान जागा मिळतील, असे म्हटले आहे.
एकंदरीत एक्झिट पोल्समध्ये सत्ताधारी एनडीएला १४६ जागा आणि महाआघाडीला ९० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला गेला आहे.
जन सुराज पक्ष एक्स फॅक्टर
निवडणूक रणनीतीकार जे पुढे राजकारणात उतरले त्या प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष हा या निवडणुकीत मोठा एक्स फॅक्टर ठरेल असे मानले जाते होते, मात्र या एक्झिट पोलनुसार त्यांचा फारसा फरक पडणार नाही असा अंदाज दिसून येत आहे.
जन सुराज पक्ष जेमतेम त्याचे खाते उघडू शकेल, तर पक्षाला शून्य ते पाच जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पक्षाला मिळणाऱ्या जागांची संख्या ही सरासरी २ इतकी आहे.
पण इतक्या कमी जागा मिळाल्या असल्या तरीही या पक्षाने विरोधी पक्षाच्या महाआघाडीची मते खाल्ली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ही महाआघाडी ही निवडणुकीत एनडीएच्या खूप मागे पडली असण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महाआघाडीमधील घटक पक्षांची वैयक्तिक कामगिरी देखील घटली आहे. सर्वच पक्षांचे सविस्तर आकडे उपलब्ध नसले तरी, एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची कामगिरी खराब झाली आहे.
एक्झिट पोलनुसार, आरजेडीला ५७ आणि ६९ च्या दरम्यान जागा मिळतील, या पक्षाला गेल्या निवडणुकीत ७५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ११ ते १४ जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज आहे, काँग्रेसला गेल्या निवडणुकीत १९ जागा मिळाल्या होत्या.
भाजपाला ६७ आणि ७० च्या दरम्यान जागांवर विजय मिळेल. ज्यामुळे भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरेल. तरीही भाजपा आरजेडीने गेल्यावेळी मिळवलेल्या जागांच्या खूपच मागे राहाणार आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाची कामगिरी गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक चागली होण्याची अपेक्षा आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने ४३ जागा जिंकल्या होत्या, यंदा तो ५८ आणि ७१ याच्या दरम्यान जागा जिंकेल असा अंदाज आहे.
