Bihar Girl Intel Package success story: “मुलींचा शिकून काय उपयोग? शेवटी सासरी जाऊन घर सांभाळायचं आहे”, असं वाक्य आजही भारताच्या ग्रामीण भागात एखाद्या मुलीला ऐकावं लागतं. या वाक्याच्या मागे असणाऱ्या मानसिकतेमुळे आजवर कित्येकांना आपली स्वप्ने सोडावी लागली आहेत. बिहारमधील एका तरूणीलाही अशाच टोमण्यांचा सामना करावा लागला. पण आईने जिद्दीने मुलीला शिकवण्याचा ध्यास घेतला. आज ही मुलगी इंटेल सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत आहे.

अनन्या शाश्वतने आपली ही कहाणी नुकतीच एक्सवर पोस्ट केली. बिहारच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास अनन्याने सांगितला. इंटेल सारख्या कंपनीत ती सिस्टिम सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाली असून तिला वार्षिक २८ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

अनन्याने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, बिहारमधील आमच्या गावात मुलींचे १८ वर्षांपर्यंत लग्न होते. मुलींनी शिकून काय होणार? असे टोमणे माझ्या आईला अनेकदा ऐकावे लागले. सर्व नातेवाईकांशी भांडून, माझ्या शिक्षणासाठी जादा काम करून आईने मला शिकवले.

अनन्या पुढे म्हणते, बिहारच्या लोकांना पक्कं माहीत आहे की, शिक्षण आमच्यासाठी पर्याय नाही तर जगण्याचे साधन आहे. आज मी यशस्वी झाले, ते माझ्या आईमुळेच. त्यामुळे ही यशोगाथा मी सर्वांसमोर मांडू इच्छिते.

अनन्याच्या पोस्टनंतर अनेकांनी तिच्या आईचे कौतुक केले. तसेच काहींनी त्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षाची माहिती करून दिली. एका युजरने लिहिले, मुलींनी शिक्षण घ्यावे, यासाठी मी नेहमीच सर्वांना प्रेरित करत असतो. माझ्या ओळखीतील एका मुलीने बीटेक करण्यासाठी कुटुंबाबरोबर भांडण केले. तिचे आई-वडिल तिला बीकॉम किंवा बीए करण्यास सांगत होते. आज ती मुलगी यूएसएला आहे.

Bihar Girl Intel Package
अनन्या शाश्वतने इंटेलमध्ये मिळवली २८ लाखांचे पॅकेज असलेली नोकरी. (Ai Image)

दुसऱ्या एका युजरने लिहिले, २८ लाख रुपये हे फक्त वेतन नाही. तर ती त्या कुटुंबाची स्वातंत्र्याची कहाणी आहे. कॉर्पोरेटच्या जगतात आम्ही याला डिस्रप्टीव्ह विकास म्हणतो.

इतरही अनेक लोकांनी या पोस्टखाली कमेंट करून सदर तरूणीचे कौटुक केले आहे.