बॉलीवूडच्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटात नायक डॉक्टर असल्याचे खोटे नाटक करतो, मात्र बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगाहा शहरात या कल्पनेपलीकडची एक भयानक वास्तव समोर आले आहे. येथील एका सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने चक्क सुरक्षा रक्षकाने जखमी रुग्णाच्या जखमेवर टाके घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहारच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी घटना काय?
बगाहा उपजिल्हा रुग्णालयातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका टेम्पो आणि पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण असताना, ऑपरेशन थिएटरमधील एक व्हिडिओ समोर आला.
या व्हिडिओमध्ये कोणताही प्रशिक्षित डॉक्टर किंवा परिचारिका नसून, गणवेशातील एक सुरक्षा रक्षक रुग्णाच्या जखमेवर टाके घालताना दिसत आहे. नियमानूसार, ऑपरेशन थिएटरमध्ये केवळ प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश असतो. मात्र, येथे एका सुरक्षारक्षकाने वैद्यकीय प्रक्रिया पार पाडल्याने रुग्णांच्या जीविताशी खेळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रुग्णांचा संताप आणि प्रशासनाचा खुलासा
जखमी रुग्ण वसीम अख्तर आणि सुरेंद्र पासी यांनी सांगितले की, “अपघातानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, तेव्हा तिथे डॉक्टर उपस्थित होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एका सुरक्षारक्षकाने आमच्या जखमा शिवल्या. हा निष्काळजीपणा असून आमच्या जीवाचे काहीही बरे-वाईट झाले असते.”
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. अशोक कुमार तिवारी म्हणाले की, “रुग्णालयात दीर्घकाळापासून कर्मचारी आणि ड्रेसर्सची पदे रिक्त आहेत. त्या दिवशी एकाच वेळी अनेक गंभीर रुग्ण आल्यामुळे आणि एका रुग्णाचा रक्तस्त्राव जास्त होत असल्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरक्षा रक्षकाची मदत घेण्यात आली होती.”
बिहारच्या आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव
हा केवळ एक सुटा प्रकार नसून तो बिहारमधील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचा पुरावा आहे. कॅगच्या (CAG) अहवालानुसार, बिहारच्या आरोग्य विभागात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार १००० लोकांमागे १ डॉक्टर असणे आवश्यक आहे, मात्र बिहारमध्ये २१४८ लोकांमागे केवळ १ डॉक्टर उपलब्ध आहे.
राज्याला १,२४,९१९ डॉक्टरांची गरज असताना केवळ ५८,१४४ डॉक्टर सेवेत आहेत तर अनेक जिल्ह्यांत परिचारिकांची १८% ते ७२% पदे रिक्त आहेत. तसेच पूर्व चंपारण सारख्या जिल्ह्यात पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची ९०% पदे रिक्त आहेत. ही घटना प्रशासनासाठी एक धोक्याची घंटा असून, केवळ ‘स्टाफ शॉर्टेज’चे कारण देऊन रुग्णांचे प्राण धोक्यात घालणे किती योग्य आहे, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
