कटिहार : बिहारच्या कटिहार जिल्ह्यत शनिवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला आणि ३० अन्य जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. कटिहारचे पोलीस अधीक्षक शिखर चौधरी यांनी सांगितले की संध्याकाळी ६.३०च्या सुमाराला राष्ट्रीय महामार्ग ३१वर एक बस, एक ट्रक आणि एका पिक-अप व्हॅनची आपापसात धडक होऊन हा अपघात झाला.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिक-अप व्हॅनमधून प्रवास करणारे शेजारील पुर्णिया जिल्ह्यतून येत होते. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा संशय आहे, असे चौधरी यांनी सांगितले. बसचालकही गंभीर जखमी झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.