Bihar Temple Stampede Lakhisarai Breaking News: बिहारमधील लखीसराय येथील अशोक धाम मंदिरामध्ये श्रावणी सोमवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून डझनभर भाविक जखमी झाले आहेत. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि जलाभिषेक करण्यासाठी सोमवारी सकाळी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमले असताना ही घटना घडली. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्रचंड गर्दीच्या वेळी मंदिरात सुमारे ५० हजार भाविक उपस्थित होते. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अशोक धाम रेल्वे स्टेशनला मंदिराशी जोडणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. रात्रीच्या वेळी या मार्गावर विजेचा खांब पडल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली होती. या पडलेल्या खांबात विद्युत प्रवाह असल्याची अफवा पसरल्यामुळे सोमवारी सकाळी भाविकांमध्ये गोंधळ उडाला. भाविक वेगवेगळ्या दिशेने धावू लागल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.

या गोंधळात अनेक जण एकमेकांवर पडले आणि स्थानिक रहिवासी तसेच इतर भाविकांनी गर्दीत अडकलेल्या लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. जखमी झालेल्या सर्व भाविक महिला असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी लखीसराय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी मदत व वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोग्य आणि बचाव पथकेही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जखमींना मदत करत आहेत.

बिहारमध्ये चेंगराचेंगरी कशी झाली?

लखीसराईचे एसडीपीओ (SDPO) शिवम कुमार यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं, “आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे १० जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. एका व्यक्तीला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात असं समोर आले आहे की, एका शेतात विजेचा खांब पडला होता. मागून येणाऱ्या लोकांनी ओरडण्यास सुरुवात केली की विजेचा खांब पडला आहे. तिथून सुमारे १०० मीटर पुढे महिला रांगेत उभ्या होत्या. या घोषणेमुळे एकच घबराट पसरली आणि काही लोकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी शेताकडे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते खाली पडले. मागून येणारे इतर लोक त्यांच्या अंगावरून पुढे निघून गेले, ज्यामुळे हा अपघात झाला. पुढील तपासानंतरच घटनेचा नेमका क्रम आणि इतर तपशील स्पष्ट होतील.”

एका भाविकाने ‘पीटीआय’ला (PTI) सांगितलं, “महिला रांगेत उभ्या होत्या. सुमारे १०-१२ महिलांनी गर्दीत घुसून आम्हाला ढकलण्यास सुरुवात केली. आम्ही खाली पडलो आणि सुमारे २०-२५ महिला एकावर एक पडल्या. गर्दीत अडकल्यामुळे अनेक महिला बेशुद्ध झाल्या. प्रचंड गर्दी असल्यामुळे हे घडले.”

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोमवारी लखीसराई येथील अशोक धाम मंदिरात घडलेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेत सात भाविकांच्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला. ही शोकांतिका “अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आणि घटनेतील जखमींवर योग्य आणि तातडीने उपचार सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचं सांगितलं.

सम्राट चौधरी म्हणाले, “लखीसराईच्या अशोक धाममधील घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. या अपघातात भाविकांच्या मृत्यूच्या बातमीने माझं मन अत्यंत व्यथित झालं आहे. शोकाकुल परिवाराप्रति माझ्या तीव्र संवेदना आहेत.” जखमींवर योग्य आणि जलद वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी पुढे सांगितले. ते म्हणाले, “जखमींवर योग्य आणि तात्काळ उपचार करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि जखमींना लवकर बरे करो.”