Jamui Viral Video : बिहारच्या जमुईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाला आणि मुलीला काही तरुणांनी अडवून त्यांना मारहाण करत त्या मुलीची छेडछाड केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, या घटनेवर प्रतिक्रिया देताना बिहार सरकारमधील एका मंत्र्यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ‘अशा घटना अधूनमधून घडतच असतात’, असं वक्तव्य बिहार सरकारमधील मंत्री श्रवण कुमार यांनी केलं. तसेच पाटणा या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना मंत्री श्रवण कुमार यांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही दिलं. मात्र, श्रवण कुमारांच्या या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

मंत्री श्रवण कुमार यांनी काय म्हटलं?

“जग गुन्ह्यांपासून पूर्णपणे मुक्त नाही. अशा घटना अधूनमधून घडतच असतात. सरकारचं अशा घटनांकडे लक्ष आहे. बिहारमध्ये असं कृत्य करणारे लोक सुटू शकत नाहीत. यापूर्वीही अशा लोकांवर कठोर कारवाया करण्यात आलेल्या आहेत”, असं मंत्री श्रवण कुमार यांनी म्हटलं.

एसआयटीची स्थापना, ३ जणांना अटक

बिहारच्या जमुईमधील या धक्कादायक घटनेची दखल घेत पोलिसांनी सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून या घटनेत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यात सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोध घेण्यासाठी आचा उप-विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

“व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या घटनेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच उप-विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठित करण्यात आली असून हे पथक पुढील कारवाई करत आहे. व्हिडीओवरून तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे”, अशी माहिती जमुईच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

जमुईतील घटनेवरून राहुल गांधींचा संताप

“बिहारच्या जमुई येथील एक व्हिडीओ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला आणि मुलीला रस्त्यावर बळजबरीने अडवण्यात आलं. त्यांना त्रास देऊन त्यांचा अपमान करण्यात आला, त्या मुलीची छेडछाड करण्यात आली. ती मुलगी हात जोडून आपल्याला सोडून देण्याची विनवणी करत होती, तरीही त्या गुंडांनी तिच्याशी झटापट केली. या लोकांना इतक्या उद्धटपणे वागण्याचा अधिकार कोणी दिला? ही पितृसत्ताक मानसिकता आहे”, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.

“त्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवली गेली पाहिजे, दोषींवर पोक्सो कायद्यांतर्गत खटला चालवून त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. तसेच जर ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली असेल तर दोषींना अजूनही अटक का करण्यात आली नाही? संध्याकाळी ७ वाजता रस्त्यांवर एखादी मुलगी सुरक्षित का नाही? याचं उत्तर बिहार सरकारने दिलं पाहिजे”, असं राहुल गांधींनी म्हटलं.

व्हिडीओत काय दिसतं आहे?

अल्पवयीन मुलगी आणि मुलगा रस्त्याने जात असतात. तेवढ्यात त्यांच्याभोवती एक जमाव येतो. हा जमाव या जोडप्याला मारहाण करू लागतो. त्यानंतर या जमावतले काही लोक मुलीचे कपडे फाडतात आणि तिचा विनयभंग करतात. ही मुलगी या जमावाला असं करू नका असं म्हणत विनंती करते. पण तिला उचलून एक जण दूर घेऊन जातो तिच्याशी असभ्य वर्तन करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.