बिहारचे सहकार मंत्री जयकुमार सिंग यांच्या मुलावर ग्वाल्हेर येथील एका प्रतिष्ठित शाळेत रॅगिंग झाल्याचा संशय असून त्यामुळे तो आता मृत्यूशी झुंज देत आहे. बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री  शिवराज सिंग चौहान यांच्याशी संपर्क साधला. मांझी यांनी चौहान यांना सांगितले की, ग्वाल्हेरच्या शाऴेत जो रॅगिंगचा प्रकार झाला त्याची चौकशी करण्यात यावी. जयकुमार सिंग यांचा मुलगा आदर्श कुमार सिंग आता दिल्लीच्या अपोलो रूग्णालयात उपचार घेत असून बेशुद्ध अवस्थेत आहे. रॅगिंग झालेला मुलगा उपचारांना प्रतिसाद देत आहे पण तो बेशुद्ध आहे.
बिहारचे मंत्री जयकुमार सिंग यांनी सांगितले की,आपला मुलगा ग्वाल्हेरच्या शिंदे शाळेत होता व नववीत शिकत होता, त्याच्यावर रॅगिंग झाल्याचा संशय आहे. शाळेच्या अधिकाऱ्यांनी मात्र या मुलाने बुधवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याने आपला मुलगा गंभीर जखमी झाला आहे असे जयकुमार सिंग यांनी सांगितले. मुलाने आईला तेथील मुले कशी त्रास देतात हे सांगितले होते,पण ही स्थिती पुढे इतकी गंभीर बनेल असे वाटले नव्हते असे मंत्र्यांनी सांगितले.