बिहारमधल्या हाजीपूर या ठिकाणी गंगा नदीत नाव उलटून अपघात झाला आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या नावेत १५ पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामपूर श्यामचंद गावाजजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत काही जणांना वाचवण्यात आलं आहे. नावेतून प्रवास करणारे लोक जेवणाच्या कार्यक्रमाला जात होते. याचदरम्यान गंगा नदीत नाव उलटली आणि त्यातील लोक नदीत पडले. दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला तातडीने याची माहिती देण्यात आली.

१० हून अधिक जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. या वेळी ४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तर १० हून अधिक जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेनंतरचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. त्यामध्ये घटनास्थळी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली असून पीडितांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिकांची धावपळ सुरू असल्याचेही दिसत आहे. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लोक आपल्या नातेवाईकांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान मृतांच्या नातेवाइकांचा आक्रोश सुरू असून पोलीस त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने नदीत धाव घेऊन पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली असून SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण अपघाताबाबात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “राघोपूर दियारा भागात नाव उलटल्याची अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद बातमी मिळाली. बुडणाऱ्यांमध्ये बहुतांश लहान मुले आहेत. ईश्वर सर्वांना सुरक्षित ठेवू दे. स्थानिक नागरिक, प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी बोलून मदत, बचाव व उपचाराच्या कामाला वेग देण्याचे निर्देश दिले आहेत.” बिहार काँग्रेस आणि आरएलएम (RLM) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनीदेखील या घटनेवर शोक व्यक्त करत मृत बालकांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि शोकाकुल कुटुंबांप्रति तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.