Bihar Muzaffarpur Hospital Fire ICU Short Circuit: दिल्लीतील मालवीय नगर येथील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत २१ जणांचा बळी गेल्यानंतर आज (गुरुवार) बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील प्रसाद हॉस्पिटलमध्ये आगीची घटना घडली आहे. या आगीत तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १५ हून अधिक रुग्ण जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ती आयसीयू वॉर्डात वेगाने पसरली, असे सांगितले जात आहे. आयसीयू वॉर्डात अनेक रुग्णांवर उपचार सुरू होते.
आग लागल्यानंतर रुग्णालयात दाट आणि विषारी धुराने इमारतीचा भाग व्यापला गेला. यामुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. पहाटे लागलेल्या या आगीनंतर बचाव आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णांना बाहेर काढले.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. बचावकार्य आणि रुग्णांचे स्थलांतर यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही रुग्णालयात पोहोचले. अतिगंभीर रुग्णांना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून रुग्णालय प्रशासन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
आयसीयूमध्ये २५ रुग्ण होते, सर्वांचा मृत्यू झाल्याचा दावा
अग्निशमन विभागाचे अधिकारी आर. एन. पांडे यांनी सांगितले की, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान रुग्णालयात पोहोचले, तेव्हा आयसीयू विभाग दाट धुराने व्यापला होता. तसेच रुग्णालयातील कर्मचारी घटनास्थळी अनुपस्थित होते.
VIDEO | Bihar: At least three killed in fire that broke out in ICU of a private hospital in Muzaffarpur. Relatives of victims allege negligence by the hospital staff.#BiharNews #MuzaffarpurHospitalFire
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2026
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/WyFdm67XnV
दरम्यान आयसीयूमध्ये २५ रुग्ण होते आणि त्या सर्वांचा मृत्यू झाला, असा दावा एका रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे. आयसीयूमध्ये नेहमी एसी सुरू असतो, त्यामुळे त्याची नियमित देखभाल करावी लागते. रुग्णालय प्रशासनाने देखभाल ठेवली होती की नाही, याची कल्पना नाही.
आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी अधिक मृत्यू झाले आहेत, असा आमचा संशय आहे. प्रशासनाने पहाटे सर्व मृतदेह बाहेर काढले. दुसऱ्या एका नातेवाईकाने सांगितले की, आग लागल्यानंतर कर्मचारी पळून गेले. ज्या रुग्णांना स्वतःच्या पायावर उभे राहता येत होते, ते स्वतः बाहेर पडले. पण ज्यांना खाटेवरून उठणे अवघड होते, ते तिथेच अडकले.

प्रशासनाने काय म्हटले?
जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी माहिती दिली की, या घटनेत तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागली तेव्हा दाखल असलेल्या इतर रुग्णांचाही शोध घेतला जात आहे. आग लागल्यानंतर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे त्यांच्या रुग्णाबद्दल विचारणा केली. रुग्णालय प्रशासन आणि यंत्रणा रुग्णांचा आढावा घेत आहे.
VIDEO | Muzaffarpur, Bihar: DM Subrata Kumar Sen on fire at ICU of a private hospital, says, "A total of 15 patients were admitted at the facility, and we have so far obtained records for 13 of them. Some patients were also being treated in the CCU. They have now been shifted and… pic.twitter.com/I0c8HYOsMO
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2026
सेन पुढे म्हणाले, “रुग्णालयाच्या आयसीयू विभागाचे पर्यवेक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत नेमका किती लोकांचा मृत्यू झाला, याची माहिती आम्ही घेत आहोत. सध्या तीन मृतदेह आढळून आले आहेत.”
ऑक्सिजन युनिट आणि मॉनिटर सिस्टिममध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे प्रथमदृष्ट्या दिसत आहे. तपास सध्या सुरू आहे. आग लागण्याचे खरे कारण शोधण्यासाठी आवश्यक लागणारी प्रक्रिया आम्ही पार पाडू, असेही जिल्हाधिकारी सेन म्हणाले.
दिल्लीतील हॉटेलला आग कशी लागली?
दिल्लीच्या मालवीय नगरमधील फ्लरिश बेड अँड ब्रेकफास्ट या हॉटेलला लागेलल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ११ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या आगीतून ५८ जणांची सुटका करण्यात यश आले. ३५ जखमींपैकी १९ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
सदर हॉटेलला सहा खोल्या बांधण्याची परवानगी असताना अनधिकृतपणे पाच मजल्यांवर २५ खोल्या बांधल्या गेल्या होत्या. फ्लरिश बीएनबी या एकाच इमारतीमध्ये फ्लरिश स्टेज आणि मिकासा इन असे दोन हॉटेल चालवले जात होते. हॉटेलला अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. या प्रकरणी आता चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.
