Nalanda Bihar Crime: वीस वर्षीय तरुणीला काही जणांनी घेरुन भर रस्त्यात तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या अंगावरील कपडे फाडण्यात आली. तरुणी किंचाळत असताना तिच्या मदतीला कोणीच धावले नाही मात्र, घटनेचा व्हिडीओ चित्रित करुन समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला. बिहारच्या नालंदामध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

तरुणीला घेरुन कपडे फाडले

समोर आलेल्या माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील नूरसराई परिसरात २६ मार्च रोजी रात्री ६ ते ७ च्या दरम्यान ही घटना घडली. पीडित वीस वर्षीय तरुणी बाजारातून माघारी घरी जात असताना तिच्याच गावातील तिघांनी तिचा रस्ता रोखला. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, “संशयितांनी तरुणीला घेरुन रस्त्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार केला तरीही संशयितांनी तिचे कपडे फाडून अर्धनग्न केले.”

मदत न करता काढला व्हिडीओ

संशयित तरुणीला घेरुन तिच्यावर अत्याचारासाठी जबरदस्ती करत असताना परिसरात असणारे स्थानिक तिच्या मदतीलाही धावले नाहीत. दरम्यान, संशयितांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित करुन तो समाज माध्यमांवर व्हायरल केला. या घटनेची ४० सेकंदाची एक व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल होऊ लागली आहे. बघ्यांनी मदत न करता व्हिडीओ काढण्याला प्राधान्य दिले, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

दोघांना अटक

पीडितीने याप्रकरणी २७ मार्च रोजी पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेशी निगडीत अशोक यादव, मात्रु माहतो उर्फ नवनीत कुमार या दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. तिसरा संशयित रवीकांत कुमार याचा सध्या पोलिस शोध घेत आहेत. पीडित तरुणी विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे.

महिलांच्या सुरेक्षाचा मुद्दा ऐरणीवर

पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेता तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, यामुळे महिलांच्या सुरेक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.