Bihar New CM Samrat Choudhary Likely to Take Oath Tomorrow: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं. बिहारसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या व्यक्तीला ते पद सोडून राज्यसभा सदस्य होण्याची इच्छा असल्याबद्दल तेव्हा अनेक तर्क-वितर्कदेखील झाले. मात्र, कालांतराने ते सर्व मागे पडले असून आता नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेत जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर नेमकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार? यावर जोरदार चर्चा चालू असून भाजपातील काही महत्त्वाच्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

बिहारमध्ये भाजपाच्या पहिल्यावहिल्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री विराजमान होण्यासाठी सर्व तयारी सज्ज झाली आहे. नितीश कुमार यांची राज्यसभेवर निवड झाल्यापासूनच संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या याद्या व्हायरल होऊ लागल्या होत्या. १९६२ साली तेव्हाच्या भारतीय जनसंघानं बिहारमध्ये पहिल्यांदाच तीन जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून भाजपा या राज्यात सातत्याने निवडणुकांचं राजकारण करत असली, तरी त्यात त्यांना कधी अपयश आलं, तर कधी यश येऊनदेखील मुख्य पदानं हुलकावणी दिली. आता मात्र नितीश कुमार राज्यसभेवर जात असताना बिहारमधल्या भाजपाच्या पहिल्यावहिल्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शपथविधीला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, नितीश कुमार यांनी आज राजीनामा दिल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या म्हणजेच बुधवारी १५ एप्रिल रोजी होईल. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे इतर काही राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. इतर मान्यवर मंडळीही या शपथविधीला येण्याची शक्यता आहे.

कोण होणार बिहारचे पुढचे मुख्यमंत्री?

एनडीएतील सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार विद्यमान उपमुख्यमंत्री व भाजपा आमदार सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचा बिहारच्या राजकीय पटलावर जंगी प्रवेश होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचवेळी, जदयूकडून सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असावेत, यासाठीही जोरकसपणे बाजू मांडली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. निशांत कुमार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबरीने आणखी एक सत्तापद निर्माण करू नये, अशी जदयूची मागणी आहे. सध्या बिहारमध्ये सम्राट चौधरी व विजय कुमार सिन्हा हे भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघही पर्यायाच्या शोधात?

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व खुद्द भारतीय जनता पक्षदेखील नितीश कुमार यांच्याजागी मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी वेगवेगळे पर्याय चाचपडून पाहात असल्याचं सांगितलं जात असलं, तरीदेखील सम्राट चौधरी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खुद्द नितीश कुमार मंगळवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीमध्ये सम्राट चौधरींच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

भाजपा नेत्यांचं पुन्हा मंत्रिपदावर पुनर्वसन!

एकीकडे सम्राट चौधरी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याचं निश्चित मानलं जात असताना दुसरीकडे बिहार भाजपातील इतर काही नेत्यांचंही मंत्रिमंडळात पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. त्यात विजय कुमार सिन्हा, मंगल पांडे आणि दिलीप जैस्वाल यांचा समावेश आहे.