बिहारच्या बक्सर या ठिकाणी एक महिला सरकारी अधिकारी तिच्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत आली आहे. सरकारी नोकरी लागून ११ महिने झाले आहेत. मात्र तिचा आठ महिन्यांचा पगार थकवण्यात आला आहे. ज्यानंतर या महिलेने कार्यालयाच्या बाहेरच कटोरा घेऊन आंदोलन सुरू केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

बिहारच्या ब्रह्मपूर येथील ग्रामीण विकास अधिकारी अलपिता सिंह यांनी कटोरा समोर ठेवून सरकारी कार्यालयाच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. अलपिता सिंह यांचा आरोप आहे की ११ महिन्यांपासून मी सरकारी नोकरी करते पण मला फक्त तीन महिन्यांचा पगार देण्यात आला आहे. ८ महिन्यांचा पगार थकवण्यात आला आहे. त्यामुळे मला आर्थिक अडचणी येत आहेत. मी वारंवार पगारासाठी पाठपुरावा केला, अर्ज केले मात्र काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे मी आता कटोरा घेऊन कार्यालयाच्या बाहेर बसले आहे.

अलपिता सिंह यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

सरकारी अधिकारी असलेल्या अलपिता सिंह यांनी कटोरा घेऊन जे आंदोलन सुरू केलं त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यानंतर जिल्हा प्रशासनालाही या प्रकरणी जाग आली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी ब्रह्मपूरच्या मुख्य ग्रामीण विकास अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. कटोरा घेऊन सरकारी अधिकारी असलेली महिला आंदोलनाला बसली आहे हे फोटो व्हायरल झाले. ज्यानंतर बक्सर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. BDO ना विचारणा करण्यात आली आहे की अलपिता यांचं आठ महिन्यांचं वेतन का देण्यात आलं नाही? त्यामागे कारणं काय आहेत ते सांगा आणि लेखी स्पष्टीकरण द्या. कुणाच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला याचंही उत्तर मागण्यात आलं आहे. आता या प्रकरणी नेमकं काय उत्तरदिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

ब्रह्मपूरचं हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. अलपिता सिंह यांच्यात आणि ब्रह्मपूरचे विकास अधिकारी यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे अलपिता सिंह यांचं वेतन लांबवलं गेलं अशी चर्चाही होते आहे. दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि BDO यांनी उत्तर द्यावं असंही स्पष्ट केलं आहे. तसंच या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. तसंच अलपिता यांना त्यांचा आठ महिन्यांचा थकीत पगार कधी मिळणार याची तारीख द्यावी अशीही विचारणा केली आहे.