बिहार विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. पावसाळी अधिवेशन ३० जुलैपर्यंत असणार आहे. अधिवेशनाचा पहिला दिवशी गोंधळाचं वातावरण दिसलं. या अधिवेशनात हेल्मेट घालून आलेल्या राजद आमदार सतीश दास यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचबरोबर त्यांनी औषधोपचोर किटही सोबत ठेवलं आहे. विधिमंडळात येताना भीती वाटत असल्याने हेल्मेट घातल्याचं त्यांनी सांगितलं. २३ मार्चला विधानसभेत झालेल्या प्रकार पाहता भीतीचं वातावरण असल्याचं त्यांनी सांगितलं. २३ मार्चला झालेल्या अधिवेशनात जोरदार राडा झाला होता.

२३ मार्चला विधानसभेत झालेलं प्रकरण राजदसहित विरोधी पक्षांनी उचलून धरलं आहे. या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र या कारवाईवर विरोधक समाधानी नाहीत. ‘२३ मार्चला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत गुंडांना बोलवलं होतं. पोलिसांचं निलंबन ही काही कारवाई नाही’, अशी टीका राजद आमदार सतीश कुमार यांनी केली आहे.

बिहार विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विधिमंडळाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. पहिल्या दिवशी अध्यक्षांचं भाषण आणि दिवगंत नेत्यांना श्रद्धांजली दिल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच २३ मार्चला झालेल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. सरकारच्या आदेशानंतर विरोधी पक्षातील आमदारांना मारहाण केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.