भीषण उष्णतेच्या समस्येला तोंड देणाऱ्या बिहारमध्ये शुक्रवारी अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. वादळी वारे, मेघगर्जनेसहीत बिहारमधील अनेक भागांमध्ये पाऊस पडला. काही तासांच्या या पावसामुळे मोठं नुकसान झालं असून वीज पडल्याने तसेच वादळी पावसाच्या तडाख्याने १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झालाय. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतची घोषणा केलीय. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. बिहारमधील या आस्मानी संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेद व्यक्त करतानाच, मदतीचं आश्वासन दिलं आहे.

नक्की वाचा >> वीज म्हणजे काय? वीज पडते म्हणजे नेमकं काय होतं? वीज पडल्यास काय करावं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील वादळी पावसामुळे आणि वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करताना घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केलाय. मोदींनी ट्विटरवरुन या घटनेसंदर्भात खेद व्यक्त करताना बिहारमधील या घटनांमुळे फार दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. देव मृतांच्या नातेवाईकांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थनाही मोदींनी केलीय. राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासन मदत कार्य करत असल्याचंही मोदींनी म्हटलंय.

बिहार सरकारचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त करताना आर्थिक मदतीची घोषणा केलीय. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून चार लाखांची मदत केली जाणार आहे. नीतीश कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये, राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज पडून ३३ जणांचा मृत्यू झालाय, असं म्हटलंय. मृतांच्या नातेवाईकांना तातडीने ही मदत मिळावी यासाठी वेगाने पंचनामे करुन ही मदत लवकरात लवकर पोहचवली जावी यासंदर्भातील निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

नीतीश कुमार यांनी वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अधिक सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय. बदलेल्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून वारंवार देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि घरातच सुरक्षित रहावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

बिहारमधील भागलपूर परिसराला वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. या ठिकाणी वीज पडून सात जणांचा मृत्यू झालाय. तर मुजफ्फरपूरमध्ये सहा लोकांचा मृत्यू वीज पडल्याने झालाय. गुरुवारी अचानक बिहारमधील वातावरण बदललं. शुक्रवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसहीत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं पहायला मिळालं. अनेक भागांचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar over 33 dead in 16 districts due to gale storms lightning nitish kumar announces financial aid scsg
First published on: 21-05-2022 at 11:56 IST