Chaos at Patliputra Station During Bihar Police Exam Rush: बिहारमध्ये रविवारी पहाटे पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावर स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी प्रचंड गोंधळ घातला. बिहार पोलीस उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी निघालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी विशेष (स्पेशल) ट्रेनची मागणी करत स्थानकावर दगडफेक केली आणि काही गाड्याही रोखल्या. या गोंधळामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. १४ ते १७ जून दरम्यान आयोजित या परीक्षेसाठी तब्बल १६ लाखांहून अधिक उमेदवार विविध केंद्रांवर पोहोचले आहेत. काही ठिकाणी दगडफेक आणि पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याच्या घटनांमुळे तणाव आणखी वाढला आहे.

‘त्या’ व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

याच गोंधळादरम्यान सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गर्दीमुळे गुदमरलेला एक तरुण अचानक जमिनीवर कोसळताना दिसत आहे. परीक्षा केंद्रावर जातानाच या तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून केला जात आहे. मात्र, पूर्व मध्य रेल्वेने हा दावा फेटाळला आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

“हे त्या भारताचे लाचार तरुण आहेत – ज्यांचे सरकार आपल्या अब्जाधीश मित्रांवर लाखो-करोडो रुपये उधळते, पण स्वतःच्या विद्यार्थ्यांना एक सुरक्षित प्रवासही देऊ शकत नाही. निवडणुकीच्या वेळी हेच सरकार पूर्णच्या पूर्ण ट्रेनची व्यवस्था करते आणि परीक्षा द्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येते ती फक्त – गर्दी, कोंदटपणा आणि लाचारी. मोदी सरकारला विद्यार्थ्यांचा आवाज ऐकायचाच नाही, याचा यापेक्षा मोठा पुरावा तो काय असू शकतो? पण मी वचन देतो – आपण हा आवाज त्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवू. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा हक्क आणि न्याय मिळेलच. १७ जून, कोटा. हाच आवाज, आता हुंकार बनेल.”

टीएमसीच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष काय म्हणाल्या?

“हे अत्यंत धक्कादायक आणि शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखे दुःखद आहे. एकीकडे नरेंद्र मोदी शासन ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि ‘स्टँड अप इंडिया’च्या वल्गना करत असताना, भारतातील तरुणांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मला प्रचंड धक्का बसला आहे आणि मी भयभीत झाले आहे.”

पूर्व मध्य रेल्वेने काय स्पष्टीकरण दिले?

“सदर घटना पाटलीपुत्र स्टेशनची नाही. तसेच, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबतची माहिती अद्याप कोणत्याही स्रोताकडून मिळालेली नाही, हे स्पष्ट करण्यात येत आहे. कृपया अशी कोणतीही अफवा किंवा भ्रम पसरवू नये. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीच्या शारीरिक हालचाली आणि स्थितीवरून प्रथमदर्शनी असे दिसून येते की, ती व्यक्ती कदाचित एखाद्या वैद्यकीय समस्येने किंवा थकव्यामुळे उद्भवलेल्या आजारपणाने ग्रस्त असावी.” असं पूर्व मध्य रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी या परिस्थितीवरून सरकारवर कडाडून टीका केली आहे. “देशातील तरुणांना एका सरकारी नोकरीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी साध्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत,” अशा शब्दांत विरोधकांनी प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मोठ्या परीक्षा आणि गर्दीचे कायमचे संकट

देशात जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणावर सरकारी भरती परीक्षांचे आयोजन केले जाते, तेव्हा रेल्वे आणि बस स्थानकांवर अशी अनियंत्रित गर्दी होणे ही आता नित्याचीच बाब बनली आहे. लाखो उमेदवारांचे भविष्य पणाला लागलेले असताना, वाहतूक आणि सुरक्षेचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.