scorecardresearch

नितीशकुमार भाजपची साथ सोडण्याची चिन्हे ; बिहारमध्ये नव्या राजकीय समीकरणांची शक्यता

राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्यातूनही नव्या राजकीय आघाडीचे संकेत मिळाले आहेत.

नितीशकुमार भाजपची साथ सोडण्याची चिन्हे ; बिहारमध्ये नव्या राजकीय समीकरणांची शक्यता
(संग्रहित छायाचित्र)

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप यांच्यातील संबंध तुटण्याएवढे ताणले गेल्याने राज्यात राजकीय वादळ घोंघावू लागले आहे. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करण्याची दाट शक्यता आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंग बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारी आमदार आणि खासदारांची बैठक आयोजित केली आहे, असे पक्षाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंग ऊर्फ ललन यांनी सोमवारी सांगितले; परंतु त्यांनी नितीश कुमार भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याच्या वृत्तावर भाष्य करणे टाळले.

दुसरीकडे, विरोधी पक्ष असलेल्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलानेही आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्यास त्यांच्याशी आघाडीची तयारीही राष्ट्रीय जनता दलाने दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बिहारमध्ये नवी राजकीय समीकरणे जुळून येण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्यातूनही नव्या राजकीय आघाडीचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या बैठका बोलावल्या जाणे, ही राजकीय परिस्थिती सर्वसाधारण नाही, असे सूचक विधान तिवारी यांनी केले. तिवारी म्हणाले की नेमके काय चालले आहे, याची व्यक्तिश: मला कल्पना नाही, परंतु विधानसभेच्या अधिवेशनाची घोषणा झालेली नसताना आमदारांचे पुरेसे संख्याबळ असलेल्या दोन पक्षांनी आपल्या आमदारांच्या बैठका बोलावणे या वस्तुस्थितीकडे आपण काणाडोळा करू शकत नाही.

नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडणार असतील तर आमचा पक्ष त्यांना भाजपच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना जवळ करेल, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले.

चाचपणीसाठी आज बैठका?

नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल या दोन्ही पक्षांनी, आज मंगळवारी आपल्या आमदारांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. त्यात संभाव्य राजकीय समीकरणे जुळवून आणण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.  

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या