Prashant Kishor on Bihar Election: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नव्याने स्थापन केलेल्या जनसुराज पक्षाचा बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. अनेक मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. बिहारच्या प्रस्थापित पक्षांना पर्याय म्हणून प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्षाची सुरुवात केली होती. मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. यानंतर आता प्रशांत किशोर यांनी एकूणच निवडणुकीबाबतचे विश्लेषण केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा दावा केला.

या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर म्हणाले की, निवडणुकीचा निकाल त्यांचा आणि पक्षाचा अपेक्षाभंग करणारा ठरला आहे. आम्ही पक्षाची यात्रा विविध जिल्ह्यांमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्हाला जनतेचा प्रतिसाद दिसून येत होता. पण जे निकाल लागले आहेत, त्याचा आणि आमच्या अंदाजाचा मेळ लागत नाही. त्यामुळे निवडणुकीत निश्चित काहीतरी गडबड झाली आहे. पण सध्या हे आरोप सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

ईव्हीएम विरोधातील पुरावा माझ्याकडे नाही

निवडणुकीत मोठी शक्ती कार्यरत होती. ज्या उमेदवारांना क्वचितच काही लोक ओळखतात त्यांनाही लाखांच्या आसपास मतदान मिळाले. काही लोक मला याबद्दल आवाज उचलण्यास सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ईव्हीएममध्ये फेरफार झाले आहेत. पराभवानंतर लोक असे आरोप करत असतात. पण माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. प्रथमदर्शनी पाहिले तर काहीतरी चूक झाली, हे निश्चितच वाटते, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडे टिव्हीशी बोलताना दिली.

महिलांना दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले

एनडीए सरकारने निवडणुकीपूर्वी बिहारमधील हजारो महिलांच्या खात्यावर पैसे टाकल्याचाही आरोप जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केला.

“निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत महिलांना दहा हजार वाटण्यात आले. महिलांना जी आश्वासने दिली गेली, त्या तुलनेत ही रक्कमही फार मोठी नव्हती. महिलांना दोन लाख रुपये मिळतील, हा पहिलाच हप्ता आहे, असे सांगितले गेले. एनडीए आणि नितीश कुमार यांना मतदान केले तर पुढचा हप्ता दिला जाईल, असेही सांगितले गेले. मला नाही आठवत देशात इतर कुठेही तब्बल ५० हजार महिलांना अशाप्रकारे पैसे वाटले गेले”, असाही आरोप प्रशांत किशोर यांनी केला.

लालू यादव यांच्या ‘जंगल राज’ची भीती

जनसुराज पक्षाचा पराभव होण्यामागे आणखी एक मोठे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या पक्षाला मतदान झाले आणि त्यातून राजदचा विजय झाला तर बिहारमध्ये जंगल राजची पुनरावृत्ती होण्याची भीती मतदारांना दाखवली गेली. याचाही फार मोठा परिणाम झाल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.