यास चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्वोत्तर भागातील राज्यांतील काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साठल्याचं चित्र होतं. रुग्णालयात गुडघाभर पाणी असल्याने अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं, त्यामुळे आधीच आजार आणि तुंबलेलं पाणी यामुळे रुग्णांचे हाल झाले. रुग्णालयाच्या ओपीडीत पाणी शिरल्याने रुग्णालय प्रशासनाची दाणादाण उडाली. पावसाचं पाणी आत शिरल्यामुळे साहित्य पाण्यावर तरंगत होतं. मात्र अशा परिस्थितीतही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा करत होते. बिहारमध्ये कटीहार येथील सदर रुग्णालयात पाणी साचलं होतं. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र अशा परिस्थितीतही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा करण्यास कुठेच कमी पडले नाहीत. रुग्णालयात रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य कर्मचारी मोटारसायकलचा वापर करत होते, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

बिहारमधील कटिहार सदर रुग्णालयच नाही तर पटण्यातील एनएमसीएच आणि जयप्रभा, सहरसाचा सदर रुग्णालाय, दरभंगातील डीएमसीएम, गयातील एएनएमएमसीएच रुग्णालयात पाणी साचलं होतं.

बिहारमध्ये चक्रीवादळामुळे एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पटना, दरभंगा, बांका, मुंगेर, बेगूसराय, गया आणि भोजपूर भागात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्तींच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.