Bihar Stampede at Baba Siddhanath Temple : बिहारच्या जहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी मोठी गर्दी झाली होती. यामुळे मंदिरात चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत ३५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. सात मृतदेह जहानाबादच्या शासकीय रुग्णायात नेण्यात आले आहेत. तसेच जखमींना देखील याच रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दुर्घटनेचं कारण शोधण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. जहानाबादच्या पोलीस निरीक्षकांनी या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्य झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की ३५ भाविक जखमी झाले असून त्यापैकी काहींना शासकीय रुग्णालयात नेलं आहे. तर काहींना मखदुमपूर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दरम्यान, या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीच्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला असून त्या व्यक्तीने या चेंगराचेंगरीच्या घटनेचं खापर प्रशासनावर फोडलं आहे. त्यांनी सांगितलं की मंदिरातील गर्दीचं नियोजन केलं गेलं नाही, तसेच येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. काही लोकांनी मला सांगितलं की, प्रशासनाने एनसीसीमधील तरुणांना सुरक्षा व येथील व्यवस्था पाहण्यासाठी तैनात केलं आहे. मात्र त्यांनी भाविकांवर लाठीहल्ला केला. ज्यामुळे भाविक धावपळ करू लागले. त्यातून मोठा गोंधळ उडाला आणि ही चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या सगळ्यात प्रशासनाचीच चूक आहे. दुर्घटनेचं कारण काय? एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की मंदिराच्या बाहेर फुलं विकणाऱ्या फेरीवाल्याचं भांडण चालू होतं. त्यावेळी लाठीहल्ला केला गेला. त्यातून लोक सैरावैरा धावू लागले आणि ही चेंगराचेंगरीची घटना घडली. ५० ते ६० जण जखमी झाले असावेत. ६ ते ७ जणांचे मृतदेह रुग्णावाहिकांमधून नेण्यात आल्याचं आम्ही पाहिलं. ही धावपळ व चेंगराचेंगरीची घटना घडत असताना इथे पोलीस प्रशासन उपस्थित नव्हतं. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे. हे ही वाचा >> Yogendra Yadav : “विरोधक मजबूत व्हावेत म्हणून RSS ने…”, योगेंद्र यादवांनी सांगितलं संघाच्या गोटात काय शिजतंय? म्हणाले, ४०० पारच्या भितीने… श्रावण महिन्यात भाविक या मंदिरात दर्शनासाठी जातात. प्रामुख्याने रविवारी रात्रीपासून मंदिरात लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. आसपासच्या गावांमधून, तालुक्यांमधून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. आज (१२ ऑगस्ट) श्रावणी सोमवार असल्यामुळे काल रात्रीपासूनच भाविकांनी या मंदिरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. अशातच ही दुर्घटना घडली.