Bihari Girls Ready for Marriage at Rs 25,000 : उत्तराखंडच्या महिला आणि बालविकास मंत्री रेखा आर्या यांच्या पतीनेच महिलांविषयी अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली आहे. तरुणांच्या गटाशी संवाद साधत असताना त्यांनी बिहार येथील महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय.
लग्नासाठी २५ हजारांत मुली मिळतात
बिहारमध्ये २० ते २५ हजारांत मुली लग्नासाठी मिळतात, असं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लालू साहू यांनी केलं आहे. गिरधारी लालू साहू तरुणांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका तरुणाशी बोलताना साहू म्हणाले, “तुम्ही म्हातारपणी लग्न करणार आहात का? तुम्हाला लग्न करायचं असेल तर बिहारमधून मुलगी आणुया. तिथे २० ते २५ हजारांत मुली मिळतात.”
गिरधारी लालू साहू यांच्या या वक्तव्यामुळे उत्तराखंड आणि बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसंच, बिहार राज्य महिला आयोगानेही याची दखल घेतली असून साहू यांना नोटीस बजावली आहे.
महिलांच्या प्रतिष्ठेवर हल्ला
काँग्रेस महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ज्योती रौतेला म्हणाल्या, “साहू यांचं वक्तव्य लज्जास्पद आहे. त्यांची पत्नीच महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत. हा महिला आणि मुलींच्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे. अशा प्रकारची विचारसरणी मानवी तस्करी, बालविवाह आणि महिलांचं शोषण यांसराख्या सामाजिक दृष्कृत्यांना प्रोत्साहन देतं.”
राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले, “१० हजार रुपयांना मते खरेदी केल्यानंतर भाजपा नेते आता बिहारमधून मुली आणण्याबाबत बोलत आहे. यातून महिलांबाबतची विषारी मानसिकता स्पष्ट होतेय.”
चहूबाजुने त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणाकरता एक व्हिडिओही सादर केला. ते व्हिडिओमध्ये म्हणाले की, “मित्राच्या लग्नाबाबत मी असं म्हणालो. मात्र, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करण्याकरता या व्हिडिओचा गैरअर्थ काढला गेला. माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावले असेल तर मी हात जोडून माफी मागतो.”
दरम्यान, भाजपानेही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. साहू यांचा भाजपाची काहीही संबंध नसल्याचंही नेत्यांनी म्हटलंय.
