उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे धक्कादायक घटनेत, एका २० वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात स्वतःला पेटवून घेतले. या दुर्घटनेत गंभीर भाजलेल्या तरुणीचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर लग्नास नकार दिला, ज्यावर पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या निष्काळजीपणाबद्दल कोतवाली प्रभारी अमर सिंह राठोड यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ही घटना २१ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. पीडित तरुणी बिजनौरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आली होती. तिने आधीच आरोपी सौरभ सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तरुणीने सौरभवर बलात्काराचे आरोप करत पहिली तक्रार २०२४ मध्ये दाखल केली होती. त्यानंतर तिने दुसरी तक्रार २०२५ मध्ये दाखल केली, ज्यात सौरभने तिच्याशी संबंध ठेवून लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते, परंतु आरोपी सौरभने उच्च न्यायालयातून आपल्या अटकेला स्थगिती मिळवली होती.

घटनेच्या दिवशी काय घडले?

२१ जून रोजी तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि तिने आरोपीला तातडीने तेथे बोलावण्याची मागणी केली. पोलिसांनी तिला दुसऱ्या दिवशी आरोपीच्या बाजूच्या लोकांना बोलावले जाईल असे सांगितले. याच दरम्यान, पीडितेच्या सावत्र वडिलांनी तिला एका बाटलीत ज्वलनशील पदार्थ आणून दिला.

संतप्त आणि हताश झालेल्या तरुणीने पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतले. तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आग विझवून तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले, जिथून नंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मृत्यूशी झुंज देत सोमवारी तिने प्राण सोडले.

पीडितेच्या आईने आरोप केला आहे कि, तक्रार दाखल केल्यापासून आरोपीचे कुटुंब तिच्या मुलीचा सतत मानसिक छळ करत होते. यामुळेच ती खुप मानसिक दबावाखाली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्ण गोपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुख्य आरोपी सौरभ आणि त्याचा भाऊ गौरव हे दोघे सध्या काश्मीरमध्ये सैन्यात तैनात आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक काश्मीरला रवाना करण्यात आले आहे.”

सध्या पोलीस या प्रकरणाचा आत्महत्येस प्रवृत्त करणे, मानसिक छळ आणि बलात्कार या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. एका तरुण मुलीचा अशा प्रकारे पोलीस ठाण्यातच मृत्यू झाल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.