राजस्थानमधील बिकानेर शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी या भागात निसर्गाचे एक असे रौद्ररूप पाहायला मिळाले, ज्याने नागरिकांच्या अंगावर काटा आणला. दुपारी अचानक आलेल्या एका महाभयंकर धुळीच्या वादळाने संपूर्ण शहराला घेरले. या वादळाचा वेग आणि तीव्रता इतकी भीषण होती की, काही मिनिटांतच संपूर्ण आकाशात धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरले आणि भरदुपारी रात्रीसारखा अंधार झाला.

सध्या सोशल मीडियावर या थरारक दृश्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये धुळीची एक अवाढव्य आणि भयानक भिंत शहराच्या दिशेने वेगाने सरकताना दिसत आहे. हे दृश्य पाहायला जेवढे अद्भूत आहे, तेवढेच ते एखाद्या प्रलय जगाचा अंत करणाऱ्या चित्रपटासारखे भीतीदायक वाटत आहे.

शहरात पसरली घबराट; जनजीवन विस्कळीत

या महावादळामुळे बिकानेरमधील दृश्यमानता पूर्णपणे शून्यावर आली. रस्त्यांवर अचानक पिवळसर-तपकिरी रंगाचे दाट धुके पसरल्यामुळे वाहनचालकांना समोरील रस्ते दिसेनासे झाले. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि अपघात टाळण्यासाठी चालकांनी वाहने बाजूला थांबवली. वादळाचा वेग वाढू लागताच नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

स्थानिक बाजारपेठांमध्ये तर एकाएकी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुकानांचे शटर पटापट खाली पडू लागले आणि रस्त्यावरील पादचारी धुळीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित आडोसा शोधू लागले. वेगवान वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.

पुढील ४-५ दिवस धोक्याचे; हवामान खात्याचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. ढोलपूर जिल्ह्यातील बारी भागात सर्वाधिक ५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जयपूर हवामान केंद्राने बिकानेर, जयपूर, अजमेर, भरतपूर, कोटा, जोधपूर आणि उदयपूर या विभागांमध्ये ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गारपीट आणि विजा पडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात हीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याने, हवामान खात्याने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.