गुजरातमधील सुरतमध्ये दुचाकीस्वाराच्या गळ्यात मांजा अडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व त्याच्या ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराची पत्नी गंभीर जखमी झाली. पत्नी व मुलीसह दुचाकीस्वार पुलावरून जात होता. त्यावेळी तो नायलॉन मांजाच्या संपर्कात आला. एका हाताने दुचाकी सांभाळत तर दुसऱ्या हाताने नायलॉन मांजा काढण्याचा दुचाकीस्वाराने प्रयत्न केला. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर दुचाकीस्वार व त्याची मुलगी पुलावरून ७० फूट खाली कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वाराची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.

सुरतमधील रेहान शेख हे त्यांच्या पत्नी रेहाना व मुलगी अलिशा (वय ७) यांच्यासह दुचाकीवरून बुधवारी (१४ जानेवारी) संध्याकाळी जात होते. संक्रातीनिमित्त सुट्टी असल्याने ते त्यांच्या कुटुंबाबरोबर एका बागेत चालले होते. त्यावेळी जीलानी पुलावरून जात असताना रेहान हे नायलॉन मांजाच्या संपर्कात आले. त्यावेळी दुचाकीचा वेग अधिक होता. त्यामुळे रेहान यांनी एका हाताने मांजा काढण्याचा, तर दुसऱ्या हाताने दुचाकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.

मांजा काढताना रेहान यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी थेट पुलाच्या कठड्याला धडकली. रेहान व त्यांची मुलगी अलिशा हे पुलावरून ७० फूट खाली जमिनीवर कोसळले. तसेच त्यांची पत्नी रेहाना या एका उभ्या असलेल्या रिक्षावर कोसळल्या. या अपघातात रेहान व त्यांची मुलगी अलिशा यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी रेहाना या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुरतमधील रेंडर पोलिस ठाण्याकडून या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एच.एन.परमार म्हणाले, “रेहान हा एका खासगी संस्थेत काम करत होता. उत्तरायण सणानिमित्त त्याला सुट्टी होती. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबाबरोबर मोराभागल येथील एक बागेत जात होता. त्यावेळी त्याचा अपघातात मृत्यू झाला. आम्ही या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. त्याच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.”