वाहतुकीचे नियम तोडण्याचा प्रकार तसा सर्रासपणे सुरु असतो. एखाद्या सिग्नलवर घाईत असताना दुचाकीस्वारावर निर्धास्तपणे सिग्नल तोडून पळून जाताना दिसतात. मात्र अशावेळी रस्त्याच्या पलीकडे ट्रॅफिक पोलीस उभे दिसल्यास त्यांची चांगलीच गोची होते. मग अशावेळी बेदरकारपणे बाईक पळवत कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी पोलीसही अनेकदा कारवाई करण्यासाठी पाठलाग करायचं सोडत नाहीत. पोलिसांच्या याच कारवाईच्या भीतीने हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराला आपली बाईक पळवणे चांगलेच महागात पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, राजा नावाचा एकजण आपल्या गर्भवती पत्नीसोबत बाईकवरुन प्रवास करत होता. राजा याने हेल्मेट घातलं नसल्या कारणाने थिरुवेरुंबुर चेकपॉईंटवर वाहतूक पोलिसांनी त्याला थांबायला सांगितलं. मात्र राजा याने बाईक न थांबवता ती पळवण्यास सुरुवात केली. राजा याने बाईक न थांबवल्याने चिडलेल्या कामराज या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कारवाई करण्यासाठी त्याचा बाईकवरुन पाठलाग करण्यास सुरुवात केली. पाठलाग सुरु असताना राजा याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि आपल्या गर्भवती पत्नीसोबत तो खाली पडला. स्थानिकांनी मात्र कामराज यांनी बाईकला लाथ मारल्याने ती पडली असल्याचा आरोप केला आहे.

राजा याची पत्नी उषा तीन महिन्यांची गर्भवती होती. धावत्या बाईकवरुन पडल्याने तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसला आणि जागीच मृत्यू झाला. बाईकस्वार राजादेखील गंभीर जखमी आहे. घटनेनंतर लोकांची गर्दी होण्यास सुरुवात झाल्याने घारबरलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

अपघातानंतर दाम्पत्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उषा यांना पोहोचता क्षणी मृत घोषित करण्यात आलं. काही लोकांनी तर वाहतूक पोलीस कर्मचारी कामराज पाठलाग करत असताना दारुच्या नशेत होते असा दावा केला आहे.

घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. हजारोंच्या संख्येने लोक थिरुवेरुंबुर येथे जमा झाले होते आणि दोन तासांसाठी वाहतूक कोंडी केली. यानंतर कामराज या पोलीस कर्मचा-याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘महिलेचा मृत्यू बाईकवरुन पडल्यामुळेच झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने अशा पद्धतीने पाठलाग करायला नको होता. आम्ही घटनेचा तपास करत आहोत’.