Bill Cosby Rape Case Verdict: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता बिल कॉस्बी ५० वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे. वेट्रेस म्हणून काम करणाऱ्या डोना मॉट्सिंगरला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर केल्याचा आरोप कॉस्बीवर ठेवण्यात आला होता. या आरोपात कॉस्बी दोषी आढळला असून, कोर्टाने ५९.२५ दशलक्ष डॉलर्स (जवळपास ४९५ कोटी भारतीय रुपये) नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिले आहेत. कोर्टाने सोमवारी हा निर्णय दिला.

निकालावर कॉस्बीच्या वकिलाची नाराजी

कॉस्बीचे वकील जेनिफर बॉनजीन यांनी याबाबतची माहिती एसोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला एका ई-मेलच्या माध्यमातून दिली आहे. वकील जेनिफर बॉनजीन यांनी निकालाबाबत नाराजी व्यक्त करत पुन्हा न्यायासाठी अपील करणार असल्याचे स्पष्ट केले. कॉस्बी प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा ‘कॉस्बी शो’ खूपच प्रसिद्ध होता.

नेमकं प्रकरण काय?

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करणाऱ्या डोना मॉट्सिंगर या महिलेने १९७२ साली कॉस्बी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. गुंगीचे औषध देऊन कॉस्बीने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. कॉस्बीच्या प्रोडक्शन कंपनी जेम्मीन आयएनसी. आणि सर्कल स्टार थिएटर्स विरोधात देखील महिलेने तक्रार दाखल केली होती. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेबाबत तक्रारदार महिलेने तक्रारीत शंका उपस्थित केली होती. 

असे असेल दंडाचे स्वरुप

कॉस्बीला याप्रकरणी ५९.२५ दशलक्ष डॉलर्स एवढी नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यात पीडित महिलेच्या भूतकाळातील मानसिक आघातासाठी १७.५ दशलक्ष डॉलर्स आणि भविष्यात तिला होऊ शकणाऱ्या मानसिक त्रासासाठी अतिरिक्त १.७५ दशलक्ष डॉलर्स. आणि शिक्षात्मक नुकसान भरपाई म्हणून ४० दशलक्ष डॉलर्स, असे या दंडाचे स्वरुप असणार आहे.

पीडित महिलेने काय सांगितले?

कॉस्बी माझा पाठलाग करायचा एक दिवस त्याने मला सर्कल थिएटरमध्ये कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले. घरी येऊन तो मला कारमधून घेऊन गेला. यावेळी त्याने मला एक ग्लास वाईन दिली. त्रास होऊ लागल्यानंतर कॉस्बी मला ड्रेसिंग रुममध्ये घेऊन गेला आणि त्रास कमी होण्याची गोळी आहे सांगत एक गोळी खायला दिली. घरी आल्यावर शुद्धीवर आल्यानंतर कॉस्बीने बलात्कार केल्याचे समजले, असे पीडित महिला डोना यांनी तक्रारीत म्हटले होते. या घटनेमुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास झाल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.