Bill Gates Apology Over Epstein Files: एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर बिल गेट्स यांनी गेट्स फाउंडेशनमधील कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. माध्यमांत दावा केला जात असल्याप्रमाणे कोणतेही गैर कृत्य केले नसल्याचे म्हणत गेट्स यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या विशेष अहवालात गेट्स यांनी माफी मागितल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले बिल गेट्स?
“एपस्टीनबरोबर वेळ घालवणे मोठी चूक होती. माझ्या चुकीमुळे इतरांना नाहक त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो”, असे बिल गेट्स म्हणाल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. गेट्स पुढे म्हणाले की, “फाउंडेशनच्या मूल्य आणि ध्येय-धोरणांच्या विरोधात हे कृत्य आहे. आपलं काम संवेदनशील आहे, त्यात प्रतिष्ठा महत्वाची आहे. लोकं आपल्याबरोबर काम करायचं की नाही? याचा निर्णय घेऊ शकतात.” गेट्स फाउंडेशनमधील कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधताना बिल गेट्स बोलत होते.
एपस्टीन फाईल्समध्ये गेट्स यांचे नाव
अमेरिकेच्या विधी विभागाने अलिकडे प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये एपस्टीन यांनी लिहलेल्या ई-मेलमध्ये बिल गेट्स यांच्याबाबत विविध दावे करण्यात आले आहेत. अमली पदार्थांसाठी गेट्स यांनी घेतलेल्या मदतीचा उल्लेख या ई-मेलच्या ड्राफ्टमध्ये करण्यात आला आहे. रशियन महिलांसोबत गेट्स यांच्या शारीरिक संबंधांचा उल्लेख देखील यात करण्यात आला आहे.
कोणतेही गैरकृत्य केले नाही – गेट्स
दरम्यान, महिलांसोबत असणारे फोटो एपस्टीनसोबतच्या बैठकीनंतर घेतल्याचा खुलासा गेट्स यांनी केला आहे. यासाठी एपस्टीनने विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले. मी कोणतेही “गैरकृत्य केले नाही, मी काही गैर पाहिलेलं नाही”, असे गेट्स कर्मचाऱ्यांशी बोलताना म्हणाले. एपस्टीन प्रकरणातील पीडित महिलांसोबत वेळ घालवला नसल्याचे गेट्स यांनी सांगितले.
२०११ ला पहिली भेट
एपस्टीनला २०११ पासून भेटत असल्याचे गेट्स यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. पण, एपस्टीनच्या इतिहास तपासून पाहिला नव्हता असेही त्यांनी सांगितले. २०१४ पर्यंत त्याच्याशी भेट होत होती. आणि एकदा खासगी जेटने प्रवास केला. पण, रात्री त्यांच्या मालकीच्या ठिकाणी अथवा आयलँडवर थांबलो नाही, असेही गेट्स यांनी स्पष्ट केले.

