वृत्तसंस्था, एपी : जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांवर उद्योगपती बिल गेट्स यांनी मंगळवारी भाष्य करत कृतींची जबाबदारी स्वीकारली. गेट्स यांच्या ‘गेट्स फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या एका टाऊन हॉल बैठकीत त्यांनी ही कबुली दिल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. गेट्स यांनी या विषयावर अतिशय मोकळेपणाने संवाद साधला, तसेच अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली, असे गेट्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.

न्याय विभागाने एपस्टीनच्या तपासाशी संबंधित जी कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत, त्यामध्ये बिल गेट्स यांचे नाव अनेकदा आले आहे. या कागदपत्रांमध्ये गेट्स आणि एपस्टीन यांच्यातील ई-मेल संवाद, त्यांच्या भेटींच्या तारखांची नोंद असलेली कॅलेंडर नोंदी आणि दोघे उपस्थित असलेल्या कार्यक्रमांमधील गेट्स यांच्या फोटोंचा समावेश आहे.

गेट्स यांच्यावर एपस्टीन प्रकरणाशी संबंधित कोणत्याही गैरप्रकाराचा आरोप झालेला नाही आणि त्यांनी एपस्टीनच्या गुन्ह्यांची कोणतीही माहिती असल्याचा इन्कार केला आहे. कामांवर चर्चा करण्यासाठी आपण एपस्टीनला भेटलो होतो आणि जागतिक आरोग्यासारख्या मुद्द्यांसाठी निधी उभारण्यास तो मदत करू शकेल, असा आपला विश्वास होता, असे गेट्स यांनी म्हटले आहे. ‘मी त्याच्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक मिनिटाचा मला पश्चात्ताप होत आहे आणि त्याबद्दल मी माफी मागतो,’ असे गेट्स यांनी या महिन्याच्या सुरुवातीला एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते.