Bill Gates Epstein Files allegations: जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी निगडीत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दस्तऐवजांमधील धक्कादायक खुलाशांनी पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ उडवली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांनुसार, या दस्तऐवजांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी संबंधित विविध आरोप करण्यात आले आहेत. ‘गेट्स यांचे रशियन महिलांसोबत लैंगिक संबंध होते. त्यांना लैंगिक संक्रमित रोग झाला होता’, असा आरोप करण्यात आला आहे.
एपस्टीनच्या २०१३ मधील ईमेलमध्ये दावा
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे रशियन महिलांसोबत लैंगिक संबंध होते. गेट्स यांना लैंगिक संक्रमनातून होणारा रोग देखील झाला होता. यानंतर गेट्स यांनी अँटीबायोटिक्स मिळवण्याचा प्रयत्न केला. पूर्वाश्रमीची पत्नी मेलिंडा गेट्स यांना गुपचूप ही अँटीबायोटिक्स देण्याचा त्यांचा प्लॅन होता, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, ही कागदपत्रं समोर येताच गेट्स यांच्याकडून या आरोपाचे जोरदार खंडन करण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्टकडून आरोपांचे खंडन
मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने या आरोपांचे खंडन करताना एपस्टीन फाईल्समधील दावे मूर्खपणाचे आणि पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. एपस्टीनचे गेट्स यांच्यासोबतचे संबंध संपुष्टात आल्याने निराशेतून आणि बदनाम करण्याच्या हेतूने असं केल्याचा प्रतिआरोप करण्यात आला आहे.
२,००० व्हिडिओ, १,८०,००० फोटो
अमेरिकेच्या न्याय विभागाने तीन दशलक्षाहून अधिक पानांची चौकशी कागदपत्रं, २,००० हून अधिक व्हिडिओ आणि १,८०,००० फोटो प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान, कागदपत्रांमध्ये नावांचा उल्लेख असणं याचा अर्थ त्या व्यक्तीला एपस्टीनच्या गैरकृत्यांची माहिती होती असा होत नाही, असे न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
गेट्स यांच्यासंबधित माहिती असणारे ईमेल ड्राफ्ट्स १८ जुलै, २०१३ रोजीचे असून, यातील काही गेट्स यांचे माजी सल्लागार बोरिस निकोलिक यांच्या शैलीत लिहिलेले आहेत. प्रकाशित कागदपत्रांमध्ये एपस्टीन आणि गेट्स एकत्र असणारे यापूर्वी कधीही न पाहिलेले फोटो देखील समाविष्ट आहेत.
एपस्टीनसोबतच्या संबंधांमुळेच गेट्स यांचा घटस्फोट?
बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा १९९४ मध्ये विवाह झाला होता. २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. गेट्स यांचे विवाहबाह्य संबंध आणि एपस्टीनसोबतच्या संबंधांमुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे मेलिंडा यांनी स्पष्ट केले होते. एपस्टीनसोबतच्या संबंधांबद्दल आपल्याला पश्चात्ताप असल्याचे यापूर्वी गेट्स यांनी कबूल देखील केले आहे. नव्याने समोर आलेल्या या कागदपत्रांतील आरोपांचे त्यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे. एपस्टीनचा २०१९ मध्ये न्यूयॉर्कमधील तुरुंगात असताना मृत्यू झाला होता.

