scorecardresearch

बिल गेट्स यांनी केलं पाकिस्तानचं कौतुक; पंतप्रधान इम्रान खान यांना फोन करत म्हणाले,…

त्यांनी आश्वासन दिलं की गेट्स फाऊंडेशन पाकिस्तानला कायम समर्थन देईल.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी इम्रान खान यांनी बिल गेट्ससोबत पोलिओ निर्मुलन आणि करोना महामारीबद्दल चर्चा केली. बिल गेट्स यांची संस्था सध्या पोलिओ निर्मुलनासह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये पाकिस्तानची मदत करत आहे.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी गेट्स यांच्याशी संवाद साधताना जगभरात गरिबी, रोगराई आणि असमानतेशी लढण्यासाठी गेट्स फाऊंडेशन करत असलेल्या कामाचं कौतुक केलं. या चर्चेची माहिती पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून एका निवेदनाद्वारे देण्यात आली. यामध्ये असा उल्लेख होता की, इम्रान खान यांनी पाकिस्तानात बिल एँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने केलेल्या कामाचं कौतुक केलं.

पोलिओ निर्मुलनासाठी पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांचं बिल गेट्स यांनी कौतुकही केलं आहे. बिल गेट्स यांनी सांगितलं की त्यांची संस्था पोलिओ निर्मुलनासाठी सातत्याने काम करत राहील. त्याचबरोबर पाकिस्तानातली लसीकरण मोहीम यशस्वी झाल्याचंही बिल गेट्स यांनी बोलून दाखवलं. त्यांनी आश्वासन दिलं की गेट्स फाऊंडेशन पाकिस्तानला कायम समर्थन देईल. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केलं आहे की पाकिस्तानमधून पोलिओ हद्दपार करणं ही सरकारची प्राथमिकता आहे आणि करोना परिस्थितीतही देशभरात पोलिओ निर्मुलन अभियान वेगाने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

निवेदनात पुढे म्हटलं आहे की, पंतप्रधान आणि गेट्स या उद्दिष्टांवर एकत्र काम करण्यासाठी तयार आहेत. इम्रान खान यांनी बिल गेट्स यांना हेही सांगितलं की पाकिस्तानात २०२१मध्ये पोलिओ रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे आणि संपूर्ण वर्षभरात पोलिओचा केवळ एक रुग्ण आढळला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bill gates imran khan bill and melinda gates foundation polio in pakistan vsk

ताज्या बातम्या