करोनाची साथ नेमकी कशी सुरूझाली याचा सगळा तपशील दिला नाही तर चीनवर निर्बंध लादण्याचे अधिकार अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देणारे विधेयक नऊ प्रभावशाली सिनेटर्सनी अमेरिकी काँग्रेसमध्ये मांडले आहे.
जगात करोना संसर्गाने अडीच लाख लोक मरण पावले आहेत. कोविड १९ उत्तरदायित्व कायदा, असे या विधेयकाचे नाव असून ते सिनेटर लिंडसे ग्रॅहॅम यांनी तयार केले आहे. त्याला इतर आठ जणांनी पाठिंबा दिला. ते अमेरिकी काँग्रेसच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे सिनेटमध्ये सादर करण्यात आले आहे.
चीनने कोविड १९ साथीची चौकशी करणाऱ्या कुठल्याही अमेरिकी पथकास किंवा मित्र देश तसेच जागतिक आरोग्य संघटना यांच्या चौकशी पथकास सगळी माहिती दिल्याचे साठ दिवसात अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रमाणित करावे, अशी तरतूद त्यात आहे. जर चीनने माहिती दिली नाही तर ट्रम्प यांना चीनवर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या निर्बंधात मालमत्ता गोठवणे, प्रवास बंदी, कर्जे रोखणे आणि इतर या उपायांचा समावेश आहे.
