भारतीय वंशाचे व्यावसायिक आणि अब्जाधीश पंकज ओसवाल यांची मुलगी वसुंधरा ओसवालने तिला स्वित्झर्लंडमध्ये वर्णभेदाचा अनुभव असल्याचं म्हटलं आहे. वसुंधरा ओसवालने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आणि त्यासह एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तुम्ही भारतात नाही असं आपल्याला सांगण्यात आलं असं वसुंधरा ओसवालने म्हटलं आहे. १९९९ मध्ये जन्मलेली वसुंधरा ही उद्योगपती पंकज ओसवाल यांची मुलगी आहे. तिने स्वित्झर्लंड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे.

वसुंधरा ओसवालची इन्स्टाग्राम पोस्ट काय?

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये वसुंधरा ओसवालने सांगितलं की, गुरुवारी दुपारी तिच्या घराच्या गेटवर एक अनोळखी व्यक्ती आली आणि त्यांनी लॉन मॉवर अर्थात गवत कापण्याचं जे यंत्र आहे ते बंद करा असं सांगितलं. ‘तुम्ही भारतात नाही आहात’ असं म्हणत या व्यक्तीने मला ‘लॉन मॉवर’ बंद करण्यास सांगितलं. माझी ही पोस्ट वाचून तुम्हाला वाटेल की ही घटना अमेरिका किंवा ब्रिटनची असेल. पण ही घटना स्वित्झर्लंडमध्ये घडली” असं वसुंधराने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आणि वसुंधरा यांच्यात वाद होताना दिसतो. त्यावेळी वसुंधराने शांतपणे त्याला सांगितले की, गुरुवारी दुपारी लॉन मॉवर वापरण्यास कोणताही कायदेशीर बंदी नाही किंवा तसा आदेशही देण्यात आलेला नाही.

लोकांचे विचार विकसित का होत नाहीत?

वसुंधरा तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, एखादा देश विकसित असेल तर तिथल्या लोकांचे विचार विकसित असतील अशी माफक अपेक्षा असते. पण वास्तव अगदी वेगळं आहे. एखाद्या देशाचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांवर ठरतो की तेथील लोकांच्या विचारसरणीवर? पाश्चिमात्य संस्कृतीला आशियाई संस्कृतीपेक्षा अधिक विकसित का मानले जाते हेच मला समजत नाही. कारण इथले काही नागरिक त्यांच्या संस्कृतीशी काही घेणंदेणं नसल्यासारखे वागतात. वसुंधरा पोस्टमध्ये म्हणते, “गेल्या आठ वर्षांपासून आम्ही स्वित्झर्लंडमध्ये राहतो आहोत आणि इथल्या सर्वांत मोठ्या घरांपैकी एक घर उभारणारे म्हणून आमची ओळख आहे. पण मला हे सांगताना अत्यंत खेद होतो आहे की, स्वित्झर्लंडमध्ये वर्णद्वेष आणि परदेशी नागरिकांविषयीचा द्वेष मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः सावळ्या किंवा गव्हाळ रंगाच्या लोकांना आणि स्थानिकांपेक्षा अधिक प्रगती करणाऱ्या लोकांना टार्गेट केलं जातं.”

वर्णभेदाच्या बाबतीत स्वित्झर्लंडची परिस्थिती गंभीर

वसुंधराने तिच्या पोस्टमध्ये असाही दावा केला की, वर्णभेदाच्या बाबतीत स्वित्झर्लंडची परिस्थिती कदाचित अमेरिका किंवा ब्रिटनपेक्षाही अधिक गंभीर आहे. तिच्या मते, स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या १७ टक्के लोकांना वर्णद्वेषाचा अनुभव आला आहे. ब्रिटनमध्ये हे प्रमाण २१ टक्के आहे. मात्र, ब्रिटनमध्ये अशा घटनांची नोंद करण्यासाठी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे तिथलं प्रमाण अधिकृत असू शकतं. पण स्वित्झर्लंडमध्ये अशी तरतूद नाही.