थ्रिलर चित्रपटात शोभेल असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुप्रसिद्ध ठग आणि सिरीयल किलर चार्ल्स शोभराज याच्या गुन्हेगारी स्टाईलने प्रेरित होऊन देशातील तब्बल ३०० हून अधिक आलिशान फाईव्ह स्टार हॉटेल्सना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या एका ६९ वर्षीय वृद्धाला रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. बिंग्सन जॉन असे या भामट्याचे नाव असून, तो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. गेल्या तीन दशकांपासून बनावट ओळखपत्रांच्या आधारे हॉटेल्समध्ये मुक्काम ठोकून, बिल न भरताच रफूचक्कर होण्यात तो पटाईत होता.

अशी असायची ‘ऑपरेशन मॉडस ऑपेरंडी’

बिंग्सन जॉन हा इंग्रजी माध्यमात शिकलेला असून अत्यंत सफाईदारपणे इंग्रजी बोलायचा. हॉटेल्समध्ये संशय येऊ नये म्हणून तो कधी विदेशी पर्यटकांचा गाईड, कधी इंग्रजीचा प्राध्यापक, तर कधी योगा ट्रेनर असल्याचे सांगायचा. फाईव्ह स्टार हॉटेल्समधील कर्मचाऱ्यांवर आपल्या उच्चशिक्षित राहणीमानाची आणि इंग्रजीची अशी काही भुरळ पाडायचा की, हॉटेल प्रशासन त्याच्याकडून कोणतीही ॲडव्हान्स रक्कम मागत नसे. काही दिवस आलिशान सोयी-सुविधांचा मोफत आस्वाद घेतल्यानंतर, कोणालाही थांगपत्ता लागू न देता तो तिथून पळ काढायचा. अनेकदा पळताना तो हॉटेलमधील महागड्या वस्तूही चोरून नेण्यात पटाईत होता.

रायपूरच्या ‘हायत’ हॉटेलमध्ये केली शेवटची चूक

काही दिवसांपूर्वी बिंग्सनने छत्तीसगडमधील रायपूर येथील प्रसिद्ध फाईव्ह स्टार ‘हॉटेल हायत’ला लक्ष्य केले. तिथे तो दोन दिवस राहिला. हॉटेलचे ६३ हजार ७५५ रुपयांचे बिल न भरताच, तो ‘ऑफिसच्या कामासाठी’ म्हणून हॉटेलचा १ लाख ४८ हजार रुपयांचा लॅपटॉप घेऊन पसार झाला. हॉटेल प्रशासनाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रायपूरच्या अँटी क्राईम आणि सायबर युनिटने तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत बिंग्सन जॉनचा माग काढत भुवनेश्वर येथून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरलेला लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी केलेल्या अपमानाचा घेतला ‘असा’ बदला!

पोलिसांच्या चौकशीत बिंग्सनने एका धक्कादायक कारणाचा खुलासा केला. १९८० च्या दशकात तो दिल्लीत गाईड म्हणून काम करायचा. पर्यटकांसोबत आल्यामुळे अनेक हॉटेल्स त्याला मोफत राहू द्यायचे. मात्र, एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी किरकोळ कारणावरून त्याचा प्रचंड अपमान केला होता. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने थेट महागड्या हॉटेल्सनाच लुटण्याचा विडा उचलला.

तिहार जेलमध्ये मिळाली ‘गुन्हेगारीची दीक्षा’

१९९० पासून बिंग्सनने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले. १९९६ मध्ये त्याला पहिल्यांदा अटक झाली आणि त्याची रवानगी दिल्लीच्या कुप्रसिद्ध तिहार जेलमध्ये करण्यात आली. याच तिहार जेलमध्ये त्याची भेट ‘बिकिनी किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठग चार्ल्स शोभराजशी झाली. शोभराजच्या गुन्हेगारीच्या आणि चकमा देण्याच्या पद्धतींनी बिंग्सन प्रभावित झाला. तिथून सुटल्यानंतर त्याने शोभराजच्याच स्टाईलने बनावट आयडी वापरणे आणि रूप बदलून हॉटेल्सना ठकवणे सुरू केले.

बिंग्सनने आपल्या आयुष्यातील तब्बल १५ वर्षे केरळ, तामिळनाडू, गोवा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह विविध राज्यांतील तुरुंगात घालवली आहेत. जेलमधून सुटले की नवीन शहरात जायचे, फाईव्ह स्टार हॉटेल गाठायचे आणि तिथून हातसफाई करून पळायचे, हा त्याचा नित्यक्रम होता. २०२२ मध्येही त्याने तिरुवनंतपुरममधील एका फाईव्ह स्टार हॉटेलला असाच गंडा घातला होता, त्यानंतर त्याला केरळच्या कोल्लम रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली होती.

बिंग्सन जॉनने आयुष्यभर लग्न केले नाही. सध्या रायपूर पोलीस या हायप्रोफाईल भामट्याची कसून चौकशी करत असून, त्याने इतर राज्यांत केलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळा करत आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.