तामिळनाडूमध्ये बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरामध्ये डोंगराळ भागात सीडीएस बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर आज दुपारी कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपिन रावत यांच्यासोबतच एकूण १४ जण प्रवास करत होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशभरातून या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. जनरल बिपिन रावत यांचं या अपघातात निधन झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाकडून अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे.

नेमकं घडलं काय?

तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ प्रवासी होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने बचावकार्य हाती घेतलं. हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ प्रवाशांचं निधन झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

बिपिन रावत यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

राजधानी दिल्लीमधील हालचालींना वेग आला आहे. दुपारी ३ च्या सुमारास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील जनरल बिपिन रावत यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ लष्करप्रमुख नरवणे यांनी देखील रावत यांच्या घरी भेट दिली. या घडामोडी घडत असताना जनरल बिपिन रावत यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

दुसरीकडे लष्करप्रमुख नरवणे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना अपघातासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून उद्या संसदेमध्ये निवेदन केलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी सीसीएस अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

आज संध्याकाळी होणऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.