पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात पोलिसांनी टाकलेल्या एका धाडीत अथांग संपत्तीचा खजिना उघडकीस आला आहे. एका माजी बस ड्रायव्हरच्या घरातून चक्क २८ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि १५ किलो सोन्याची नाणी व बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. या संपूर्ण जप्त मालमत्तेचे बाजारमूल्य ५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पैशांचा डोंगर एवढा प्रचंड होता की नोटा मोजण्यासाठी आणलेल्या ५ मशीन्स सतत चालल्यामुळे बंद पडल्या. तब्बल १५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही सर्व रोकड लोखंडी ट्रंका आणि गोण्यांमध्ये भरावी लागली.
भिंतीत अन् गोण्यांमध्ये नोटांचे बंडलच बंडल…
बीरभूम जिल्ह्यातील मोहम्मद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊचा परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. आरोपी मिनार मंडल याच्या घरावर पोलिसांनी मध्यरात्री अचानक धाड टाकली.
सुरुवातीला पोलिसांना ५ ते ६ कोटी रुपयांची रोकड सापडेल असा अंदाज होता. परंतु घराच्या कानाकोपऱ्यांत, भिंतींमधील गुप्त कप्प्यांत आणि कपाटांमध्ये शोध घेतला असता नोटांनी भरलेल्या ३५ हून अधिक गोण्या आणि ट्रंक्स बाहेर आल्या. त्यानंतर बँकेकडून विशेष नोटा मोजण्याच्या गाड्या आणि मशीन्स मागवून गुरुवारी सकाळपर्यंत ही मोजदाद सुरू ठेवण्यात आली होती.
बस ड्रायव्हर ते ५० कोटींचा मालक…कसं उभ राहिलं काळ्या पैशांचं साम्राज्य?
या प्रकरणात पोलिसांनी मिनार मंडल याला अटक केली आहे. मिनार हा पूर्वी राज्य परिवहन महामंडळात बस ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता.
परंतु, तो बीरभूममधील वाळू व दगड खदाणीच्या बेकायदेशीर सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार तुलू मंडल (उर्फ मोहम्मद नजीबुद्दीन) याचा मेहुणा आहे. सरकारी नोकरी सोडल्यानंतर मिनारने तुलू मंडलच्या बेकायदेशीर व्यवसायात प्रवेश केला. टोल नाक्यांवरून जाणाऱ्या ट्रक्सकडून वसुली करण्याची जबाबदारी मिनारकडे होती. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, जप्त केलेली ही सर्व अथांग रोकड आणि सोने तुलू मंडलच्या बेकायदेशीर सिंडिकेटचेच असल्याचे मिनारने कबूल केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक: ‘भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरन्स’
या मोठ्या यशस्वी कारवाईनंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की, वाळू माफियांविरुद्ध कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या दलाने केलेली ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद आहे. मोहम्मद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू माफिया तुलू मंडलच्या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत ५.५ कोटींहून अधिक रोख (सुरुवातीची मोजदाद) आणि १५ किलो सोने जप्त करण्यात आले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था यंत्रणेने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, राज्य सरकारचे भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण कायम राहील. सार्वजनिक संसाधनांची लूट करून काळा पैसा जमवणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला किंवा राजकीय आश्रय घेणाऱ्या माफियांना सोडले जाणार नाही.
सत्ताधारी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप
या कारवाईनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कारण मुख्य संशयित तुलू मंडल हा तृणमूल काँग्रेसच्या (TMC) बीरभूममधील एका स्थानिक बड्या नेत्याचा अत्यंत विश्वासू मानला जातो. या धाडीनंतर तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत गोटातच जोरदार वाक्युद्ध रंगले आहे:
- कुणाल घोष (TMC नेते): “काही नेते ‘चांगले कार्यकर्ते’ बनून असा काळा पैसा लपवून ठेवत आहेत का? ज्यांच्या घरातून हे पैसे जप्त झाले आहेत, त्यांची कसून चौकशी झालीच पाहिजे.”
- कल्याण बॅनर्जी (TMC खासदार): “बीरभूम ही काहींची खाजगी मालमत्ता मानली जायची. अशा गुन्हेगारांशी नेमके कोणाचे आणि काय संबंध आहेत, याची उच्चस्तरीय चौकशी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी करावी.”
- प्रसून बॅनर्जी (TMC नेते): “पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे. हा पैसा नेमका कोणाचा आहे आणि या सिंडिकेटमध्ये आणखी कोण-कोण सामील आहे, याचा संपूर्ण पर्दाफाश झाला पाहिजे.”
१०० कोटींचं शाही लग्न अन् बॉलिवूड स्टार्सची हजेरी!
या धाडीमुळे तुलू मंडलच्या अथांग संपत्तीच्या आणि उधळपट्टीच्या जुन्या चर्चा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. २०२४ मध्ये बीरभूममधील सुरी येथे तुलू मंडलने आपल्या मुलीच्या लग्नाचा एक अत्यंत आलिशान आणि शाही सोहळा आयोजित केला होता.
- या एकाच लग्नासाठी तब्बल १०० कोटी रुपये उधळले गेल्याची चर्चा होती.
- या सोहळ्याला अरबाज खान, जरीन खान या बॉलिवूड कलाकारांसह अंकुश हाजरा आणि दर्शना बानिक यांसारख्या बंगाली चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
सध्या बीरभूम पोलीस आणि इतर तपास यंत्रणा या काळ्या पैशांचे मूळ शोधण्यासाठी मिनार मंडलची कसून चौकशी करत असून, फरार मुख्य सूत्रधार तुलू मंडलच्या शोधात ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत.
