हिंदू व मुस्लिमांमध्ये जननदर सारखाच, लोकसंख्या रचनाही स्थिर; ‘प्यू रिसर्च सेंटर’संस्थेचे सर्वेक्षण

प्यू रीसर्च सेंटरच्या अभ्यासानुसार १९५१ पासून भारताच्या धार्मिक लोकसंख्यात्मक रचनेत फार थोडा फरक व बदल आहे.

‘प्यू रिसर्च सेंटर’संस्थेचे सर्वेक्षण

नवी दिल्ली : भारतात फाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येची रचना स्थिर राहिली असून हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्माच्या लोकसंख्येत घट होताना दिसत आहे. जननदरही सारखाच असल्याचे ‘प्यू रिसर्च सेंटर’ या वॉशिंग्टनमधील संस्थेने म्हटले आहे. भारताच्या जनगणनेवरून तसेच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या आधारे संस्थेने हे निष्कर्ष काढले आहेत.

जननदर, स्थलांतर व इतर घटकांवर लोकसंख्येची रचना अवलंबून असते. जननदराचा विचार केला तर मुस्लिमांतील जननदर आधी जास्त होता पण आता तो कमी होत चालला आहे. १९९२-२०१५ या काळात मुस्लिमांमधील जननदर ४.४ वरून २.६ झाला आहे. हिंदूंमधील जननदर हा ३.३ वरून २.१ झाला आहे. भारताचा सरासरी जननदर २.२ असून तो अमेरिकेसारख्या आर्थिक प्रगत देशांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेतील जननदर हा १.६ आहे १९९२ मध्ये भारताचा जननदर ३.४ होता तर १९५१ मध्ये ५.९ होता.

प्यू रीसर्च सेंटरच्या अभ्यासानुसार १९५१ पासून भारताच्या धार्मिक लोकसंख्यात्मक रचनेत फार थोडा फरक व बदल आहे. काही दशके अल्पसंख्याकांमध्ये जननदर हिंदूंपेक्षा जास्त होता पण आता त्यांच्यातही तो कमी होत आहे. १९५१ ते १९६१ या काळात मुस्लिमांची लोकसंख्या ३२.७ टक्क्यांनी वाढली, हे प्रमाण भारताच्या एकूण २१.६ टक्के या जननदरापेक्षा ११ टक्क्यांनी अधिक होते. पण नंतर ही तफावत कमी होत गेली. २००१ ते २०११ या काळात मुस्लिमांची लोकसंख्यावाढ २४.७ टक्के होती तर भारताची एकूण वाढ १७.७ टक्के होती त्यामुळे या काळात ७ टक्क्यांची तफावत दिसून येते.

भारताची ख्रिश्चान लोकसंख्या कमी वेगाने वाढली. अलीकडच्या जनगणनेनुसार २००१ ते २०११ या काळात ख्रिश्चानांचा लोकसंख्या वाढीचा दर १५.७ टक्के होता तर फाळणीनंतरच्या काळात तो २९ टक्के होता. एकूण सर्वच धर्माच्या लोकसंख्येत वाढ झालेली दिसून येते. १९५१ ते २०११ या काळात मुस्लिमांची संख्या ४.४ टक्के वाढून ती १४.२ टक्के झाली. हिंदूंची लोकसंख्या वाढ ४.३ टक्क्यांनी कमी होऊन ती ७९.८ टक्के झाली. हिंदू, मुस्लीम ख्रिश्चान, शीख, बौद्ध व जैन या सहा प्रमुख धार्मिक गटांची लोकसंख्या वाढलेली दिसून येते.

स्थलांतर प्रक्रियेचाही प्रभाव

१९५० पासूनच्या स्थलांतर प्रक्रियेने लोकसंख्येची रचना बदलली आहे. भारतात राहणारे ९९ टक्के लोक हे येथेच जन्मलेले असून भारतात येणाऱ्यांची संख्या जाणाऱ्यांपेक्षा कमी आहे. भारत सोडून जाणाऱ्यात हिंदूंपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त आहे. भारतात आलेल्या व कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांच्या संख्येबाबतही शंका असून जर परदेशातून मोठ्या प्रमाणावर मुस्लीम आले असे गृहित धरले तर लोकसंख्येच्या रचनेत त्याचा परिणाम दिसायला हवा होता तो दिसत नाही. धर्मांतराचा मुद्दा गौण असून भारतात ९८ टक्के लोक ते ज्या धर्माचे आहेत त्याच धर्माने ओळखले जातात. भारतात परदेशातून आलेल्या मुस्लीम स्थलांतरितांची संख्या जास्त असल्याचा मुद्दा पुढे करून नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी या दोन मुद्द्यावर वाद झाले होते. धर्मांतर विरोधी कायदेही अनेक राज्यात मंजूर झाले आहेत. पण लोकसंख्येच्या रचनेचे खरे चित्र पाहिले तर ते वेगळेच दिसते आहे.

प्यू रिसर्च सेंटरने जून २०२१ मध्ये धार्मिक सहिष्णुता व भारतातील धार्मिक वर्गवारी या विषयावर आधी एक अहवाल सादर केला होता त्याला दुजोरा देणारे निष्क र्ष आताच्या अभ्यासातून पुढे आले आहेत. पारशी समाजात मात्र १९५१ ते २०११ या काळात लोकसंख्या १ लाख १० हजारावरून साठ हजारापर्यंत खाली आली.

मध्य भारतात जननदर जास्त आहे. बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांत  एकूण जननदर अनुक्रमे ३.४ व २.७ इतका दिसून आला आहे. तमिळनाडू व केरळात तो अनुक्रमे १.७ व १.६ दिसून आला आहे.

भारताच्या १२० कोटी लोकसंख्येतील ८० लाख लोक हे कुठल्याच सहा प्रमुख धर्मातील नाहीत. या गटात आदिवासींचा समावेश आहे. स्त्रीभ्रूणहत्येमुळे १९७० ते २०१७ या काळात मुलींच्या संख्येत २ कोटींनी घट दिसून आली. भारतातील हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन समाजात स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार दिसून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Birth rate is the same between hindus and muslims population structure is also stable akp

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी