प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिट्स पिलानी’ (BITS Pilani) च्या गोवा कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. एका २६ वर्षीय पीएचडी (PhD) विद्यार्थ्याने भाड्याने राहत असलेल्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. गेल्या दीड वर्षांत कॅम्पसमध्ये झालेला हा सहावा मृत्यू असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

संबंधित विद्यार्थी कॅम्पसबाहेर भाड्याने घर घेऊन राहत होता. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक ‘सुसाईड नोट’ हस्तगत केली असून, त्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

आत्महत्येच्या संसर्गाची भीती काय आहे?

डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत या कॅम्पसमध्ये एकूण ६ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे जिल्हास्तरीय देखरेख समितीने ‘आत्महत्येचा संसर्ग’ (Suicide Contagion) किंवा ‘समूहाचा परिणाम’ असल्याचा धोका व्यक्त केला आहे.

काय असतो हा परिणाम?

जेव्हा एकाच परिसरात किंवा समूहात वारंवार आत्महत्येच्या घटना घडतात, तेव्हा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या इतर व्यक्तींमध्येही तशीच कृती करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. अशा घटनांचे वारंवार होणारे भावनिक वृत्तांकन किंवा सोशल मीडियावरील चर्चांमुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढून ‘अनुकरण’ करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते, असे समितीने म्हटले आहे.

समितीच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

सप्टेंबर २०२५ मधील घटनांनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. २ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या या अहवालात काही महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अभ्यासाचा प्रचंड ताण, कामगिरीचा दबाव आणि झोपेचा अभाव यामुळे विद्यार्थी तणावाखाली असतात, असे नमूद केले आहे. संस्थेत सध्या समुपदेशन केंद्रे असली, तरी त्यांची क्षमता वाढवण्याची नितांत गरज आहे. अनेक विद्यार्थी आपल्या समस्या कोणाशीही शेअर करू शकत नसल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतात.

पोलीस तपासात काय समोर आले?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मागील पाच मृत्यूंपैकी किमान तीन प्रकरणांमध्ये ‘शैक्षणिक ताण’ (Academic Stress) हेच मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. तर इतर प्रकरणे वैयक्तिक कारणांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणावर संस्थेच्या प्रवक्त्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आता शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.