खरी माणुसकी ! निराधार महिलेवर आमदारांनी केले अंत्यसंस्कार

संबंधित महिलेची जात माहीत नसल्याने समाज वाळीत टाकेल, या भीतीने गावातील कोणीही अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हतं

भिक्षा मागून जगणाऱ्या एका निराधार महिलेच्या मृत्यूनंतर आमदाराने स्वत: तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. ओडिशाच्या झारसुगुडा येथे हा प्रकार समोर आला आहे.

संबंधित महिलेची जात माहीत नसल्याने समाज वाळीत टाकेल, या भीतीने गावातील कोणीही अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हतं. झारसुगुडा मतदारसंघातील अमनपाली गावात संबंधित महिला ही भिक्षा मागून जगत होती. तिच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नसल्याची माहिती रेंगाली मतदारसंघातील बिजू जनता दलाचे आमदार रमेश पटुआ यांना पोलिसांनी दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील घटना नसतानाही तातडीने आपला मुलगा आणि भाच्याच्या साह्याने संबंधित महिलेची अंत्ययात्रा काढत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

रमेश पटुआ हे ओडिशातील सर्वांत गरीब आमदारांपैकी एक असून, ते अद्यापही भाड्याच्या घरात राहतात. पटुआ यांनी त्यांच्या या कृत्यातून समाजापुढे आदर्श ठेवला असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बीजेडी आमदार रमेश पटुआ यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, या गावामध्ये दुसऱ्या जातीच्या व्यक्तीच्या मृतदेहाला हात लावला तर समाज वाळीत टाकतो अशी धारणा आहे. मी लोकांना अंत्यसंस्कार करण्याची विनंती करत होतो पण हात लावला तर जातीतून काढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मी तातडीने माझ्या मुलाला आणि भाच्याला बोलावलं आणि त्या महिलेवर अंत्यसंस्कार केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjd mla ramesh patua performs last rites of poor woman in odisha jharsuguda district

ताज्या बातम्या