BJP Accuses Congress of Trying to Halt Vande Mataram : नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे काँग्रेसच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’चं गायन सुरू असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हातवारे करताना दिसत आहेत. यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय गीताचे गायन मध्यभागी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे आरोप काँग्रेसने खोडून काढले.

भाजपाचा आरप काय?

भाजपाच्या गुजरात युनिटने काँग्रेसवर राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. “व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा वंदे मातरमचा अपमान केला आहे”, असं त्यांनी एक्सवर पोस्ट केलं. दरम्यान, भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, “व्होट बँकेच्या लांगूलचालनासाठी; सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी वंदे मातरमचे पूर्ण गायन थांबवण्याचा प्रयत्न केला. वंदे मातरमचा द्वेष असल्यामुळेच काँग्रेस लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिली नाही.”

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “दशकांपासून, गांधी आणि काँग्रेसचे सांस्कृतिकदृष्ट्या आत्मविश्वासू, सभ्यतावादी मुळे असलेल्या भारताच्या कल्पनेशी अस्वस्थ संबंध राहिले आहेत. तीच अस्वस्थता, दुर्दैवाने स्वातंत्र्यदिनी उघडी पडली.”

काँग्रेसचं स्पष्टीकरण काय?

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हे दावे फेटाळून लावले असून कार्यक्रमात ‘वंदे मातरम’चे पूर्ण व्हर्जन गाण्यात आले होते आणि ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, सोनिया गांधी यांनी केवळ खरगे यांच्यासाठी खुर्ची आणण्यास सांगितलं होतं, कारण त्यांचं वय पाहता ते बऱ्याच वेळेपासून उभे होते.

काँग्रेसच्या कार्यक्रमातील पूर्ण वंदे मातरम गायनाबद्दल विचारलं असता, काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितलं, “आज येथे इंदिरा भवनमध्ये वंदे मातरमचं पूर्ण व्हर्जन गाण्यात आलं आणि यात कोणताही वाद नाही. ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. काँग्रेस अध्यक्ष बऱ्याच वेळ उभे असल्याने, सोनिया गांधी त्यांच्यासाठी खुर्ची आणण्यास सांगत होत्या.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केलं ७५ मिनिटे भाषण

आज पहाटे, लाल किल्ल्यावरील सोहळ्यादरम्यान पहिल्यांदाच ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले. लष्कराच्या बँडने ‘वंदे मातरम’ची धून वाजवली आणि उपस्थित पाहुण्यांनी राष्ट्रीय गीत गायले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. याप्रसंगी पंतप्रधानांनी ७५ मिनिटांचे भाषण केले. या सोहळ्यात अमित शाह, किरण रिजिजू, किंजरापू राम मोहन नायडू यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी व लष्करी अधिकारी उपस्थित होते. मात्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सलग दुसऱ्यांदा या कार्यक्रमाला जाणे टाळले.